कळवण : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोण्यामध्ये भरून कांदा आणावा व मोकळ्या जागेत कांदा लिलाव करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तालुक्यातील संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कळवण बसस्थानकाजवळ रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे व प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, या आंदोलनामुळे कळवण शहरातील मुख्य रस्त्यावर सुमारे अर्धातास वाहतुकीची कोंडी झाली.तब्बल अर्धातास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेला फटका बसला. कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांना माहिती समजताच त्यांनी संतप्त शेतकरी बांधवांच्या भावना व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची भूमिका समजावून घेऊन शासनस्तरावर आपल्या मागण्या पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांना निवेदन देण्यात आले.११ जुलैपासून कांदा व्यापाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापार्यांनी नुकत्याच मनमाड येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा गोण्यामध्ये भरुन आणावा व मोकळ्या जागेत कांदा लिलाव करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. व्यापाऱ्यांनी मोकळ्या जागेत कांदा लिलाव करावे व कांदा गोण्यांमध्ये भरून विक्रीसाठी आणावा अशी भूमिका घेऊ नये, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.शासनाने बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली बाजार समितीचा कारभार सुरू करावा, जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील व्यापारी बांधवांनी बाजार समितीतील व्यापारी परवाने परत केले असल्याने बाजार समितीच्या व्यापारी संचालकांचे संचालकपद रद्द करण्यात यावे, अशी मागणीदेखील गोविंद पगार यांनी यावेळी केली.आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र वाघ, शहरप्रमुख नगरसेवक साहेबराव पगार, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रामा पाटील, अॅड. भाऊसाहेब पवार, शेतकरी नेते बारकू पगार, मिलिंद मालपुरे, रवींद्र पवार,चेतन पगार, रवींद्र गांगुर्डे, राजाराम गांगुर्डे, बाळासाहेब देवरे, प्रवीण गांगुर्डे, सुभाष पगार, श्यामराव पगार, राजेंद्र सोनवणे, प्रभाकर बोरसे, सुधाकर पगार, देवराम पगार आदीसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी कळवणचे पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद जाधोर, पोलीस हवालदार बबनराव पाटोळे दिलीप पवार, साळी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
कळवणला शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By admin | Updated: July 25, 2016 23:24 IST