आझादनगर : मालेगाव येथील महामार्गालगत असलेले साबण कारखाने तोडण्यासाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर दगडफेक केल्यामुळे दोन कर्मचारी जखमी झाले. मनपाच्या जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या. पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. याप्रकरणी प्रदीप रामदास देवरे (३०) रा. आंबेडकरनगर या कर्मचाऱ्याने पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी १३ आरोपींना अटक केली आहे.मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोलिसांसह साबण कारखान्यांचे अतिक्रमण काढण्यास गेले होते. यावेळी संशयित आरोपी यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून अपशब्द वापरले. त्यांना समजावून सांगण्याचा राग आल्याने दगड, विटा फेकून मारले. यात फिर्यादी व इतर कर्मचाऱ्यांना दुखापत केली. जेसीबीची (क्र. एमएच ४१ ए १२४) काच फोडण्यात आली. म्हणून पोलिसांनी सरकारी कामात अडथळा केला व विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यात एक इको स्पोर्ट कार (क्र. एमएच ४१ व्ही ८३८६) जप्त करण्यात आली. अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक डी. झेड. गढरी करीत आहेत. (वार्ताहर)
अतिक्रमण काढण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक
By admin | Updated: April 7, 2016 23:57 IST