याबाबत मोटवानी रोडवरील समीर उल्हास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ते मोटारीतून (एमएच१५ एफएफ ५००४) चेहेडी उड्डाण पुलावरून चेहेडी जकात नाका येथे समांतर रस्त्याने जात होते. यावेळी त्यांना कोणी तरी गाडीवर दगड फेकून मारल्याचा आवाज आल्याने शिरसाठ यांनी गाडी थांबविली. यावेळी युवकांचे टोळके रस्त्यावर आरडाओरड करून वाहनांवर दगडफेक करत शिवीगाळ करत होते. त्या युवकांमधील संशयित कृष्णा हिरणवाळे हा शिरसाठ यांच्याकडे आला आणि म्हणाला, ‘मी या परिसराचा भाई आहे, तू येथे थांबू नको, चालता हो...’ असा दम त्याने दिला. शिरसाठ यांनी त्वरित नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. यावेळी युवकांनी दगड फेकून मारल्याने शिरसाठ यांच्या महिंद्रा कारच्या छताचे नुकसान झाले.
नाशिकरोड पोलीस घटनास्थळी आले असता, आरडाओरड करणारे संशयित रझा मेहमूद शेख (चेहडी पंपिंग), ओंकार किशोर आवारे (भगवान चौक, चेहेडी पंपिंग), कृष्णा नामदेव हिरणवाळ (गवळीवाडा, चेहेडी पंपिंग), विशाल ऊर्फ बाळा संजय शिंदे (चिंचोली नाका), प्रशांत विनोद बायस, कुणाल शिवाजी पवार (दोघे रा. संगमेश्वरनगर, चेहेडी पंपिंग), ऋषिकेश संजय बुरकुल (चेहेडी पंपिंग) हे घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.