नाशिक : जिल्ह्यातील जे किडनी रुग्ण ट्रान्सप्लांटच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी अद्यापही प्रतीक्षाच करावी लागणार आहे. सध्या केवळ दिल्ली आणि मुंबईसारख्या ठिकाणीच किडनी ट्रान्सप्लांट सुरू असून नाशिकमध्येदेखील खासगी रुग्णालयांतील ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया सुरू होण्यास काहीशी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्णांना कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्यामुळे किडनीशी संबंधित कोरोनाच्या काळात सर्वच शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झालेल्या होत्या. त्यामुळे गत ९ महिन्यांपासून किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया केवळ मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणीच सुरू होत्या. नाशिकसारख्या शहरांमध्ये देखील अद्यापही या शस्त्रक्रिया सुरुच झालेल्या नाहीत. तसेच नाशिकच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात बांधण्यात येत असलेल्या किडनी ट्रान्सप्लांट विभागाचे काम कोरोना काळात ठप्प झाले होते. जिल्ह्यातील अन्य रखडलेल्या प्रकल्पांना डिसेंबरपासूनच प्रारंभ झाला असला, तरी या किडनी ट्रान्सप्लांट विभागाच्या कामाला मुहूर्त लागलेला नाही. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण विभागाच्या कामास २०१८ सालीच मंजुरी मिळाली होती. त्या कामासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातच एका स्वतंत्र मजल्याचे बांधकाम करून अन्य यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या आकृतीबंधासही परवानगी देण्यता आली होती. मात्र, त्यानंतर प्रारंभी तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाल्याने बांधकामच सुरू झाले नव्हते. त्यानंतर, गतवर्षाच्या प्रारंभी बांधकामास प्रारंभ झाल्यानंतर पुन्हा कोरोनामुळे कामकाज ठप्प झाले. मात्र, आता शासनाचे अन्य सर्व प्रकल्प हळूहळू पूर्ववत सुरू झालेले असतानाही, या बांधकामाला मुहूर्त लागू शकलेला नाही. किडनी प्रत्यारोपणासाठी रिट्राइव्हल सेंटर म्हणून नाशिकमधील संदर्भ सेवा रुग्णालयास केव्हाच परवानगी मिळाली आहे. मात्र, बांधकामाचे स्ट्रक्चरच उभे राहू शकलेले नसल्याने पुढील सर्व प्रक्रियाच ठप्प झालेली आहे. त्यामुळे तिथेदेखील अद्याप शस्त्रक्रियांना प्रारंभ होऊ शकलेला नाही.
इन्फो
प्रचंड खर्चिक शस्त्रक्रिया
नाशिक जिल्ह्यामध्ये हजाराहून अधिक पेशंट डायलिसिसवर आहेत, तर नाशिक विभागात ही संख्या तीन हजारांहून अधिक आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च परवडत नसल्याने, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनी ट्रान्सप्लांट विभाग कधी कार्यरत होतो, याकडे हे रुग्ण डोळे लावून बसले आहेत. त्यांच्यासाठी हा किडनी ट्रान्सप्लांट विभाग मोठे जीवदान ठरू शकतो.
कोट
आम्हाला तातडीने ट्रान्सप्लांट करणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वच ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया ठप्प झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरी सल्ल्यानुसार गोळ्या, डायलिसिस आणि अन्य औषधोपचारावरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाचे भय आणि त्याचा प्रसार लवकर संपुष्टात येऊन किडनी रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांटचा पर्याय उपलब्ध व्हावा, हीच प्रतीक्षा आहे.
जयेश चव्हाण, रुग्ण
इन्फो
लवकरच ट्रान्सप्लांटला प्रारंभ
कोरोनामुळे किडनी ट्रान्सप्लांटचे काम बंद होते. मात्र, आता मुंंबई, दिल्लीबाहेरही अन्य ठिकाणी या शस्त्रक्रिया सुरू होतील. नाशिकसारख्या शहरातही या शस्त्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येतील. मात्र, त्यातही ज्या रुग्णांमध्ये रिस्कचे प्रमाण कमी असेल त्यांनाच प्राधान्य देण्यात येईल.
डॉ. देवदत्त चाफेकर, किडनी विकारतज्ज्ञ