नाशिक : शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व निर्यातीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन, शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणत वाढावी, याकरिता राज्य स्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१२) नाशिक पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढावी, यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक आहे. रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरिकांनाही त्याची माहिती मिळावी, हा या सप्ताहाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळ्यात दर रविवारी किंवा महिन्यातून किमान एक-दोन वेळा याचे आयोजन करावे, अशा सूचनाही कृषी मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाने या आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा अनुभव व ज्ञानाचा फायदा करून घेऊन, सदर रानभाज्यांची माहिती ही पुस्तक स्वरूपात तयार करून जतन करावी व त्या माहितीची जनजागृती व प्रसार करावा, तसेच हे प्रदर्शन भरविण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देऊन कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.
यावेळी रानभाज्यांचे संवर्धन, संकलन व प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला, तसेच कृषी विभागातील युरिया ब्रिकेट अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. या महोत्सवात ७७ भाज्यांचा प्रदर्शनात समावेश करण्यात येऊन २५ भाज्या या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, दिलीप देवरे, गटविकास अधिकारी डॉ. सागरिका वारी आदि उपस्थित होते.