नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मातोरी गावात चंदन चोरांचा सुळसुळाट वाढला असून, अनेक चंदनाची झाडे चोरीला जात आहेत. या गोष्टींकडे पोलीस यंत्रणेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, जागेवर कोणताही पंचनामा होत नसल्याने शेतकरीवर्ग नाराज असल्याची बातमी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध होताच तालुका पोलीस स्टेशनकडून गावातील स्थानिक पोलीस पाटलाच्या सहायाने चोरीस गेलेल्या चंदन वृक्षाचे स्पॉट पंचनामे घेण्यास सुरुवात करण्यात आली. रात्रीच्या वेळी स्थानिक गावकऱ्यांच्या सहायाने गस्त घालणार असल्याचे गावचे पोलीस पाटील रमेश पिंगळे यांनी सांगितले. तसेच शेतकरी वर्गाने चंदन चोरास सामील असलेल्या स्थानिकांचे नावे सांगावीत जेणे करून मुख्य सूत्रधारपर्यंत पोहचता येईल, असेही आवाहन केले. पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काळोगे व दराडे करत आहे. (प्रतिनिधी)
मातोरीतील चंदनचोरी घटनेचा पंचनामा सुरू
By admin | Updated: July 26, 2016 00:24 IST