सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या १३० व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवास बुधवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला. पहाटे चारला बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व स्नेहा धिवरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरु णा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व योगिता मोरे, देवस्थानचे विश्वस्त धर्मा सोनवणे व कमळाबाई सोनवणे यांच्या हस्ते देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.आज बुधवारी पहाटे तीनपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारुडे, भजने आदी कार्यक्र मांचे आयोजन केले होते. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणाºया शहनाई व सनई चौघड्यामुळे शहरातील वातावरण भल्या पहाटे भक्तीमय झाले होते. महापूजेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.महाआरतीनंतर महाराजांच्या दर्शनसाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महापुजेनिमित्त श्री यशवंतराव महाराज मित्र मंडळातर्फे दिवसभरात मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांसाठी ६०० किलोंची साबुदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. दरम्यान, येथील बागलाण तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा आज सकाळी प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व स्नेहा धिवरे यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम, राजेश भोपळे, श्रद्धा भोपळे, पोलीस नाईक देवराम खांडवी व नंदा खांडवी यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. तुषार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. दुपारी तीन वाजता पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे व पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांच्या सपत्नीक हस्ते महाराजांच्या रथमिरवणुकीस सुरु वात झाली.यात्रोत्सवानिमित्त रथ यात्रेला सन १९२१ पासून प्रारंभ झाला .या रथाचे शिल्पकार कै.भिका रत्तन जगताप आहेत .रथाचे वैशिष्ट्य म्हणजे जगताप यांनी पंधरा फुट उंचीचा हा कोरीव रथ तयार केला.विशेष म्हणजे जगताप यांनी पायाचा स्पर्श न करता तीन वर्ष लाकडावर काम करून रथाची निर्मिती केली. त्यानंतर त्याचे १९२१ मध्ये देवमामलेदारांच्या यात्रोत्सवासाठी विनामुल्य अर्पण केला.या रथ यात्रेच्या परंपरेला आज ९६ वर्ष पूर्ण होत आहे.
सटाण्यात देवमामलेदार यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:13 IST