नाशिक : शासनाकडून मुद्रांक शुल्कासोबत जमा होणाऱ्या अतिरिक्त एक टक्का अधिभाराची रक्कम राज्यातील २५ महानगरपालिकांना वितरित करण्याचे आदेश नगर विकास खात्याने काढले असून, त्यामुळे सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील थकबाकीची सुमारे १४ कोटी रुपयांची रक्कम नाशिक महापालिकेला प्राप्त होणार आहे. एलबीटीमुळे घटत चाललेल्या उत्पन्नामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला या रकमेने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.शासनाने राज्यातील महानगरपालिकांना एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणाऱ्या रकमा वितरित करण्यासाठी सन २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात ८०० कोटींची तरतूद मान्य केली आहे. याशिवाय जून १४ मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे ४९५ कोटींची अतिरिक्त तरतूद मान्य करण्यात आली होती. त्यानुसार एकूण १२९५ कोटींची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील २५ महापालिकांची जानेवारी ते मार्च २०१४ या कालावधीतील सुमारे २३८ कोटी रुपयांची थकबाकी वितरित करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाने मान्य केला आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेला तीन महिन्यांची थकबाकीची १४ कोटी ४५ लाख १३ हजारांची रक्कम प्राप्त होणार आहे, तर मालेगाव महापालिकेला ४२ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम प्राप्त होणार आहे. एलबीटी लागू झाल्यानंतर नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून, त्याचा ताण विकासकामांसह आस्थापना खर्चावरही पडत आहे. शासनाकडून १४ कोटी रुपये का होईना मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या झुंजणाऱ्या महापालिकेला काहीअंशी दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
मुद्रांक शुल्क अधिभाराचे पालिकेला मिळणार १४ कोटी
By admin | Updated: July 23, 2014 00:28 IST