नाशिक : शहर आणि शहरातील विविध भागांतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत एस.टी. बसेसने त्र्यंबकेश्वरला सुमारे सहा लाख भाविकांची वाहतूक करण्यात आली. दुपारनंतर त्र्यंबकला जाणाऱ्या भाविकांचा वेग वाढल्याने प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महामंडळाने त्र्यंबकेश्वरसाठी खास ३०० बसेसची व्यवस्था केली आहे. दुपारी १२ ते दुपारी १.३० या कालावधीत वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती; परंतु दीड वाजेनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.राज्य परिवहन महामंडळाने त्र्यंबकेश्वरसाठी ३०० बसेसचे नियोजन केले होते. त्यानुसार जव्हारफाटा, विल्होळी, शहरातील मेळास्थानक, नाशिकरोड बसस्थानक, डोंगरे वसतिगृह, के. के. वाघ, संदीप पॉलिटेक्निक या वाहनतळांवरून प्रवासी वाहतूक करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ७,७१९ फेऱ्या होऊन ४ लाख ७४ हजार भाविकांची वाहतूक करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वरचा रस्ता सुरळीत झाल्यावर दुपारनंतर प्रवासी पोहचविण्याच्या कामाला गती आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे सहा लाख भाविकांची वाहतूक करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहता मेळास्थानकातून दर पाच मिनिटांनी त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. तसेच ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना खास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबरच नाशिकरोड स्थानकातूनदेखील त्र्यंबकेश्वरसाठी थेट बसेस सोडण्यात आल्या होत्या. या भाविकांना त्र्यंबकेश्वर बसस्थानकावर सोडण्यात येत होते.
एस.टीने 6 लाख भाविक त्र्यंबकला
By admin | Updated: September 13, 2015 22:22 IST