शहरात अवैध मद्य विक्री जोरात
नाशिक : लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीची दुकाने बंद असल्याने अवैध मद्य विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक भागात सर्रास अवैध मद्य विक्री केली जाते. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध मद्य विक्रीला पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणे पोलिसांना माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हॉटेलचालकांसमोर विविध अडचणी
नाशिक : मागील वर्षापासून अडचणीत सापडलेल्या हॉटेल उद्योगाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही व्यावसायिकांनी तर हॉटेल बंद करणे पसंत केले आहे. हॉटेलचे मेन्टेनन्स आणि स्टाफ सांभाळणे अनेकांना कठीण झाले आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही ग्राहक येतात की नाही, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्याने सध्या तरी पर्यायी व्यवसाय करण्याचा विचार अनेक जण करीत आहेत.
रस्त्यावर वाढली वाहनांची वर्दळ
नाशिक : कोरोना निर्बंध शिथिल होण्याच्या एक दिवस आगोदरच रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याचे दिसून आले. गडकरी चौक, मुंबई नाका, महात्मा गांधी रोड, शिवाजी राेड तसेच जुने नाशिक परिरसरात वाहनांची वर्दळ सुरू झाली होती. द्वारका परिसरही गजबजला होता.
रिक्षांमध्ये असुरक्षित वाहतूक सुरूच
नाशिक : सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला परवानगी नसतानाही रिक्षातून असुरक्षितपणे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे दिसते. चालकांकडून मास्क हनुवटीवर ठेवलेला दिसतो. प्रवाशांकडूनदेखील अनेकदा नियमांचे उल्लंघन होते. तीन ते चार प्रवासी रिक्षातून प्रवास करीत असल्याचे दिसून येते.
टाकळी रस्त्यावर नाल्यांची डागडुजी
नाशिक : टाकळी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून, त्या रस्त्यावरील भूमिगत गटारींची डागडुजी करण्यात येत आहे. डांबरीकरणामुळे या रस्त्यावरील भूमिगत गटारीचे ढापे खोल गेल्याचे या ढाप्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
बाजारात आंब्यांची आवक वाढली
नाशिक : मे महिन्याच्या अखेरीस बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. बाजारात हापूस, बदाम, केसर तसेच लालबाग आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या ५० ते १०० रुपये किलो या दराने आंबे विक्री केली होत आहे. हापूस आंबे २०० ते २५० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय
नाशिक: लोखंडे मळा-जेलरोड रस्ता पोलिसांनी बंद केल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्यांची गैरसोय होत आहे. स्थानिक नागरिकांनादेखील वळसा घालून जावे लागत आहे. आता निर्बंध शिथिल करण्यात आल्याने येथील बॅरिकेड्स काढण्याची मागणी परिसरातील नागिरकांनी केली आहे.