स्नीती सूर जणू चंद्र जाहले! नाशिकमध्ये रंगला पाडवा पहाट

By धनंजय रिसोडकर | Published: November 14, 2023 02:17 PM2023-11-14T14:17:06+5:302023-11-14T14:17:22+5:30

संस्कृती नाशिक आयोजित पाडवा पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहरु चौकात शास्त्रीय गायिका पंडीता स्निती मिश्रा यांची बहारदार मैफल रंगली.

Sniti Sur like the moon! | स्नीती सूर जणू चंद्र जाहले! नाशिकमध्ये रंगला पाडवा पहाट

स्नीती सूर जणू चंद्र जाहले! नाशिकमध्ये रंगला पाडवा पहाट

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तिन्ही सप्तकात लीलया फिरणाऱ्या बहारदार स्वरांतून निघालेल्या पल्लेदार तानांनी पाडवा पहाटच्या मैफलीचा रंग उगवतीच्या सूर्याप्रमाणे बहरतच गेला.  गोड गुलाबी थंडीत पिंपळपारावर रसिकांनी शास्त्रीय गायिका पं. स्निती मिश्रा यांच्या चंद्रासम शीतल आणि उगवतीच्या भास्कराप्रमाणे लखलखीत सुरांची जणू मेजवानीच अनुभवली. 

संस्कृती नाशिक आयोजित पाडवा पहाट या कार्यक्रमाच्या निमित्ताने नेहरु चौकात शास्त्रीय गायिका पंडीता स्निती मिश्रा यांची बहारदार मैफल रंगली. नाशिकच्या सांगीतिक सांस्कृतिक परंपरेचा वारसा नवोदितापर्यंत पोहोचावा, नामवंत शास्त्रीय गायक कलावंतांच्या गायकीचा आस्वाद नाशिककरांना घेता यावा, या हेतूने संस्कृती नाशिक संस्थेतर्फे आयोजित मैफलीचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष होते.  मैफिलीच्या प्रारंभी स्नीती यांनी भैरव रागातील विलंबित बडा ख्याल, छोटा ख्याल तसेच एक तराणा सादर केला. त्यानंतर जगताल तीन तालातील बंदिश सादर करीत  मैफलीच्या प्रारंभीच तोडीसह सुरांवरील हुकूमतीने रसिकांचे मन जिंकून घेतले .  नैना मोरे तरस गये आजा बलम परदेसी या ठुमरीने तर  रसिकांची मनमुराद दाद मिळवली. यावेळी त्यांनी सुफियाना शैलीतले पिरयानो हे काश्मिरी गाणेदेखील सादर केले. ग्वाल्हेर घराण्याच्या वैशिष्ट्यांसह केलेल्या बहारदार सादरीकरणाने स्निती मिश्रा यांनी मैफल उत्तरोत्तर रंगवत नेली . मिश्रा यांना सारंगीवर प्रख्यात वादक मोमीन खान तबल्यावर पं. अजीत पाठक, पं. सुभाष दसककर  तर तानपुरावर गायत्री पाटील आणि साक्षी भालेराव यांची साथसंगत लाभली . दक्षिणगंगा गोदावरीच्या काठी वसलेलं, वाढलेलं नाशिक शहराच्या जुन्या खुणांची खडानखडा माहिती असलेल्या आणि त्या नाशिकची  माहिती 'डिस्कव्हरी ऑफ नाशिक' या पुस्तकातून मांडणारे तसेच नाशिकचा विश्वकोश म्हणून ज्ञात असलेल्या डाॅ. कैलास कमोद यांना संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शास्त्रीय गायिका पं. स्निती मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. कमोद यांनी नाशिकचा चहू अंगाने विकास होत असला तरी नाशिकची मूळ संस्कृती कायम ठेवण्याची जबाबदारी नेत्यांबरोबरच आपणा सर्व नाशिककरांचे असल्याचे सांगितले. संस्कृतीचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी 25 वर्षांपासूनच्या या उपक्रमाला नाशिककर भरभरून दाद देत असल्याबाबत नाशिककरांचे आभार मानले . पंडितास नीती मिश्रा आणि डॉक्टर कमोद यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे  वाचन मिलिंद गांधी यांनी केले.  यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार ,माजी मंत्री बबन घोलप,डॉ. शोभा बच्छाव,  माजी महापौर अशोक मुर्तडक, ॲड. यतीन वाघ, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, ॲड. नितीन ठाकरे,ॲड. जयंत जायभावे, विश्वास ठाकूर, गुरमीत बग्गा, लक्ष्मण सावजी, सुरेश भटेवरा,  कर्नल आनंद देशपांडे,  दिनकर पाटील, शरद आहेर, आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पियू आरोळे यांनी केले. 

मराठी भावगीतांना सर्वाधिक दाद

मूळच्या ओरिसा प्रांतातील असूनही आणि संगीत शिक्षण वाल्हेर घराण्याचे अर्थात हिंदीतील असूनही स्नीती यांनी मराठी भाषेतील दिग्गज कलाकार गायकांची भावगीते सादर करीत रसिकांची फर्माईश पूर्ण केली . बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल या भक्ती गीतापासून प्रारंभ केल्यानंतर कुसुमाग्रजांच्या हे सुरांनो चंद्र व्हा या भावगीताने जणू रसिकांवर चंद्रासम शितल सुरांचा जणू अभिषेकच केला .
किशोरी अमोणकर यांच्या हे शाम सुंदरा राजसा मनमोहना तर आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मी राधिका मी प्रेमिका या भावगीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली .  त्याशिवाय मूळ वसंतराव देशपांडे यांच्या घेई छंद मकरंद या नाट्यपदाने तर रसिकांना परमोच्च आनंद दिला.

Web Title: Sniti Sur like the moon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.