नाशिक : ‘नाशिकने आजवर मिळालेल्या संधीच्या बऱ्याच बसेस चुकविल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’ अभियानात सहभागी होण्याची बसही दारात उभी आहे. ही बस चुकली तर पुन्हा संधी नाही. आता बसमध्ये बसा आणि या बसमधून उतरायचे की नाही याचा फैसला मार्चमध्ये घेऊ’, असे आवाहन करत आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या महासभेत उपस्थित नगरसेवकांचे तिकीट फाडले आणि साधक-बाधक चर्चेनंतर महापौर अशोक मुर्तडक यांनीही ‘स्मार्ट सिटी’ प्रस्तावाच्या बसला डबलबेल देत मुंबई व्हाया दिल्लीकडे मार्गस्थ होण्यास हिरवा कंदील दाखविला. दरम्यान, स्मार्ट सिटी अभियानाबाबत प्रभागातील नागरिकांची मते जाणून घेण्याबरोबरच काही प्रगत शहरांमध्ये नगरसेवकांचे दौरे आयोजित करण्याचाही महासभेत निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात सहभागी होण्यासाठी नाशिक महापालिकेने राज्य शासनाला गुणांक तक्ता सादर केला असून त्याबरोबरच सहभाग नोंदविण्यासाठी महासभेचा ठरावही महत्त्वाचा असल्याने आयुक्तांकडून तसा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेत ठेवला होता. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सुरुवातीलाच स्मार्ट सिटीबाबत निवेदन करताना आपली भूमिका स्पष्ट केली. महापालिकेने स्मार्ट सिटीसाठी १० जुलैला गुणांक तक्ता सादर केला असून तसे पुरावेही देण्याचे आदेश आले आहेत. त्यासाठी येत्या २३ जुलैला बैठक होणार आहे. तत्पूर्वी महासभेकडून सहभाग नोंदविण्यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. त्याला अधिक विलंब करता येणार नाही. या प्रकल्पात महापालिकेचा ५० टक्के हिस्सा तर केंद्र व राज्य सरकारचा संयुक्तपणे ५० टक्के हिस्सा राहणार आहे. कंपनी स्थापन होऊन त्यावर नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यामार्फत कामकाज चालणार आहे.
‘स्मार्ट सिटी’ प्रस्तावाला महासभेची डबलबेल
By admin | Updated: July 18, 2015 00:21 IST