लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका एस बॅँकेच्या माध्यमातून येत्या १५ आॅगस्टपासून ‘स्मार्ट सिटी’ डेबिट कार्ड बाजारात आणणार असून, नियमित कर भरणा करणाऱ्या पन्नास हजार नागरिकांना सदर कार्डाचे मोफत वितरण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. नागरिकांचा डिजिटल पेमेंटसाठी अधिकाधिक सहभाग वाढावा, हा हेतू या कार्डवितरणामागे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकचा समावेश झाला आहे. शहराला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आणि डिजिटलायझेशन करणे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या जाणार आहेत. त्याचाच भाग म्हणून नागरिकांचा डिजिटल पेमेंटसाठी सहभाग वाढवा, याकरिता महापालिका आणि एस बॅँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्मार्ट सिटी’ कार्ड बाजारात आणले जाणार आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, येत्या १५ आॅगस्टला सदर कार्डाचा शुभारंभ करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ५० हजार कार्डांचे मोफत वितरण केले जाणार आहे. त्यासाठी नियमित कर भरणा करणाऱ्या नागरिकांची यादी तयार करण्यात येत आहे. आॅगस्टपासून सेवाही आॅनलाइनमहापालिकेमार्फत सद्यस्थितीत २२ नागरी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ४५ प्रकारच्या सेवा पुरविल्या जातात. आॅगस्टपासून या सेवा आॅनलाइनच्या माध्यमातून पुरविण्याचा मानस असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. नागरिकांना आॅनलाइनद्वारे अर्ज करून घरबसल्या विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. केवळ विवाह नोंदणीसारख्या प्रमाणपत्रांसाठी महापालिकेच्या कार्यालयात यावे लागणार आहे. सदर सेवा कार्यान्वित करण्याचीही तयारी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
महापालिका आणणार ‘स्मार्ट सिटी’ कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:25 IST