नाशिकरोड : मनुष्य जन्म हा आपल्या हाती असलेला हिरा आहे. देवाची उपासना ही भौतिक शक्ती असून, शिव ही आध्यात्मिक शक्ती आहे. ती शक्ती शोधण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नसून ही शक्ती आपल्यातच आहे, असे प्रतिपादन गजानन कस्तुरे गुरूजी यांनी केले.जेलरोड येथील केशव कृपा ट्रस्टप्रणीत राधे राधे सोशल ग्रुपतर्फे श्रावणी सोमवारनिमित्त जुना सायखेडारोड वैशालीनगर वैभव लक्ष्मी मंगल कार्यालयात शिव आराधना कार्यक्रमात रुद्राभिषेक व १०८ बिल्वपत्र अर्पण करण्यात आले. यावेळी कस्तुरे गुरुजी बोलत होते. गेल्या १३ वर्षांपासून गजानन कस्तुरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यांच्या प्रत्येक सोमवारी शिव आराधना कार्यक्रम होत आहे. श्रावणी सोमवारी शिव आराधना कार्यक्रमात सायंकाळी साडेसहा वाजता रुद्राभिषेकास प्रारंभ होईल. ७ आॅगस्टच्या सोमवारी मूग, १४ आॅगस्टला जवस व २१ आॅगस्टला सातूची शिवमूठ वाहिली जाणार आहे. भाविकांनी वाहिलेले धान्य आदिवासी पाड्यांवर व गरिबांना वाटप केले जाणार असून, त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली जाते.