नाशिक : जेलरोड, लोखंडेमळा येथील संतोष पाटील या युवकाचा पाच दिवसांपूर्वी झालेल्या खुनाचा उलगडा झाला असून, आई-बहिणीने दिलेल्या सुपारीतूनच खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे़ याप्रकरणी मयत संतोष पाटील याची बहीण, मावसभाऊ व इतर दोन अशा चार संशयितांना अटक करण्यात आली आहे़ या खून प्रकरणी न्यायालयाने या चौघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़जेलरोड लोखंडेमळा येथील हनुमंतानगरमधील रहिवासी संतोष ऊर्फ पप्पू यादव पाटील (३८) याचा पंचक सायट्रीक कंपनीमागील मोकळ्या जागेतील निंबाजी बाबा मंदिराजवळ गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे बुधवारी (दि़८) सकाळी उघडकीस आले होते़ मयत संतोषला दारू पिण्याचे व्यसन होते. तसेच त्याची पत्नी अडीच वर्षांपूर्वीच मुलीसह त्याला सोडून गेली होती़ मयत संतोषची बहीण मनीषा विनायक पवार ही त्यांच्या घराजवळच राहात असे़ तर संतोष हा दारू पिण्यासाठी पैसे हवे यासाठी आई-वडिलांना मारहाण करून त्रास देत होता़ घर व शिर्डी येथील मालमत्ता माझ्या नावावर करा, अन्यथा दहा लाख रुपये द्या़ मला बायको व मुलीला आणावयाचे आहे, असे सांगून तो गेल्या काही दिवसांपासून घरच्यांना खूप त्रास देत होता़ त्यामुळे त्रस्त झालेली आई बेबीबाई यादव पाटील व बहीण मनीषा पवार यांनी आपला मावसभाऊ गणेश बाळासाहेब ढमाळे (३०, रा़ पवारवाडी व्यायामशाळेजवळ, जेलरोड) यास सांगितले की, संतोष हा खूप त्रास देत असून, त्याचा कायमचा बंदोबस्त कर, त्याकरिता आवश्यक ते सर्व काही देऊ़ महापालिका निवडणुकीच्या दरम्यान गणेश ढमाळे हा जेलरोड येथील एका सराईत गुन्हेगाराकडे यासंदर्भात गेला होता़ मात्र त्याने निवडणुकीच्या कामानंतर बघू असे सांगितले होते़ मात्र त्यानंतरही संतोषचा घरी त्रास देण्याचा प्रकार सुरूच होता़ गत मंगळवार, दि़७ मार्च रोजी संतोष हा मद्याच्या नशेत घरी आला. त्याने आई-वडिलांना मारहाण केली़ आई बेबीबाई व बहीण मनीषा हिने ढमाळे यास फोनवरून सदर प्रकार सांगितला़ त्यानंतर त्याने संबंधित सराईत गुन्हेगारास फोन करून पुन्हा संतोषचा काटा काढण्याबाबत चर्चा केली़ मात्र संबंधित गुन्हेगाराने नंतर बघू, असे सांगितले़ रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गणेश ढमाळे व त्याचे मित्र संजय पंढरीनाथ पाटील (३२), सुधीर सखाराम खरात (३५, दोघेही रा़ सम्राट अशोकनगर, दसक, जेलरोड) या दोघांना घेऊन संतोषच्या घरी आला़ तिथे आई व बहिणीशी चर्चा केल्यानंतर संतोषचा काटा काढल्यास ४० हजार रुपये देण्याचे कबूल केले़ त्यानंतर ढमाळे व त्याचे दोन मित्र दुचाकीवरून संतोषला गोडीगुलाबीने बोलत पंचक सायट्रीक कंपनीमागील मोकळ्या जागेत घेऊन गेले़ तेथून गणेश ढमाळे हा दुचाकी घेऊन निघून गेला़ संशयित संजय पाटील व सुधीर खरात व मयत संतोष यांनी मोकळ्या जागेवर दारू पिल्यानंतर त्यांनी वाद घातला़ यानंतर या दोघांनी पॅँटच्या पट्ट्याने संतोषचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून त्याचा खून केला़
आई-बहीण यांनीच दिली खुनाची सुपारी
By admin | Updated: March 12, 2017 20:52 IST