सिन्नर : येथील झोपडपट्टीधारकांची घरे त्यांच्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, ही प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.सिन्नर शहर व परिसरातील झोपडपट्टीधारक रहिवाशी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आमदार माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेउन शासनाच्या अध्यादेशाची माहिती दिली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे झोपडपट्टीधारकांच्या नावावर घरे होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या बैठकीस निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुनील सौंदाणे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष सौ.लता मुंडे, नगरपालिका आरोग्य समितीच्या सभापती सुजाता गाडे, नगरसेवक बापू गोजरे, हर्षद देशमुख, नगरसेवक मल्लू पाबळे, भूमिअभिलेखचे तालुका निरीक्षक सानप आदि उपस्थित होते. शासकीय जागेत असलेल्या शहरातील झोपडपट्टीधारकांची घरे त्यांच्या नावावर करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील सुमारे हजारांहून अधिक असलेल्या झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाकडून नगरपालिका हद्दीतील व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील शासकीय जागांवर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांची घरे त्यांच्या नावावर करण्याचा अध्यादेश निघाला आहे. मात्र आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नसल्याने त्याचा लाभ मिळत नाही, असे निदर्शनास आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत झोपडपट्टीधारकांची बैठक घेऊन आमदार कोकाटे यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महसूल विभागाच्या यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात रहिवाशी कमी पडल्याने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता होऊ शकली नाही. परिणामी शासनाचा अध्यादेश निघूनही त्याचा उपयोग होत नाही. झोपडपट्टीतील मालमत्तेच्या मोजण्या करून त्यांची एकत्रित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांना कोकाटे यांनी यावेळी दिल्या.या अध्यादेशामुळे परिसरातील भराडवाडी, जोशीवाडी, गौतमनगर, तांबेश्वरनगर, अपना गॅरेज झोपडपट्टी व तळवाडी येथील झोपडपट्टी-धारकांना याचा लाभ होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्या जागेत वास्तव्य करीत असलेले रहिवाशी पाणीपट्टी, घरपट्टीची देयके भरीत होते. अशा रहिवाशांना हा लाभ होणार आहे. या बैठकीची माहिती मिळाल्याने या बैठकीत काय निर्णय होतो याची उत्सुकता असलेले सुमारे सातशे झोपडपट्टीधारक यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)
सिन्नरच्या झोपडपट्टीधारकांची घरे होणार नावावर
By admin | Updated: July 24, 2014 00:57 IST