सिन्नर : शहर व तालुक्यात दिवाळी सणाच्या स्वागतासाठी सर्वच सज्ज झाले आहेत. विविध वस्तू बनविण्यासाठी कारागिरांची जणू लगीनघाई सुरू झाली असल्याचे चित्र आहे. पूजेच्या साहित्यासह विविध वस्तू बाजारात दाखल झाल्याने दुकाने सजली आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. खरीप हंगामातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतींच्या कामांना सुरुवात झाली आहे; मात्र या दोन हंगामाच्या मध्यावर येणारा व शेतकऱ्यांना थोडी उसंत मिळणाऱ्या टप्प्यात हा सण येत असल्याने उत्साहाने हा सण साजरा करण्यात येतो. तालुक्यातील दिवाळी सणावर खरीप हंगामाच्या अर्थकारणाचा परिणाम दिसून येतो. दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांमध्ये फारसा उत्साह दिसून येत नसला तरी माळेगाव व मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील नोकरदार वर्गाचीच वर्दळ दिसून येत आहे. सद्यस्थितीत माळेगाव व मुसळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांनी कामगारांना दिवाळीचा बोनस दिला असून, कामगारांनी दिवाळीच्या खरेदीला प्रारंभ केला आहे. दिवाळीत विशेषत: कपड्यांची खरेदी हमखास होते. यंदा तयार कपडे घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे. नोकरदार व महिलावर्गाकडून तयार मिठाई व फराळाच्या तयार पदार्थांना पसंती असते. काही महिला पीठ, तेल देऊन कारागिरांकडून फराळाचे पदार्थ बनवून घेतात, तर काही महिला थेट तयार मालच घरी आणतात. पणत्या, मेणबत्त्या, नवे कपडे, फटाके, मेवा-मिठाई, अगरबत्ती, अत्तर, विविध गृहोपयोगी वस्तू आदिंची खरेदी सुरू झाली असल्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. (वार्ताहर)
सिन्नरला दिवाळीसाठी सजली बाजारपेठ
By admin | Updated: November 11, 2015 00:01 IST