सिन्नर : रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सिन्नर नागरी सहकारी पतसंस्थेतल्या ठेवी परत मिळत नसल्याने व शाखांना कुलूप असल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून ठेवीदार व खातेदारांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. सुरुवातीला त्यांना पैसे देण्यात आले. मात्र त्यानंतर संस्थेतील खेळते भांडवल संपल्याने ठेवीदारांना दोन-चार दिवसांनी येण्याचे आश्वासने दिली जात होती. त्या आश्वासनांची पूर्ती होऊ शकली नाही तसेच अध्यक्ष सूरज शहा व कार्यकारी संचालक ए. टी. जंजिरे संस्थेकडे फिरकत नसल्याने कर्मचारी हतबल झाले होते. संस्थेतून पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी शाखेतील कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे कर्मचारी घाबरले होते. ठेवीदारांच्या रोषामुळे कर्मचाऱ्यांनी शाखा उघडण्यास असमर्थता दर्शविली. बुधवार व गुरुवार या दोन्ही दिवशी वावीवेस भागातील मुख्य कार्यालय व शिंपी गल्लीतील शाखा उघडली गेली नाही. शाखांना कुलूप असल्याने ठेवीदार बंद शटरवर लाथा मारत होते. ठेवीदारांनी मोर्चा काढून संबंधितांवर कारवाई करावी व ठेवी मिळण्याची मागणी केली. अध्यक्ष शहा व संचालक जंजिरे यांचे भ्रमणध्वनी बंद आहेत. त्यांच्या घरांनाही कुलूप असल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहे. रोष वाढत असल्याने पाहून उर्वरित संचालक मंडळाने जिल्हा उपनिबंधकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. संस्थेवर प्रशासक नेमण्यासह खातेदार व ठेवीदारांचे पैसे परत देण्यासह पावले उचलावीत अशी मागणी संचालक मंडळाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे समजते. (वार्ताहर)
सिन्नर पतसंस्था : दोन दिवसांपासून शाखांना कुलूप
By admin | Updated: July 11, 2014 00:21 IST