नाशिक : वाहनांची सतत वर्दळ, शालेय विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉसिंगची भीती, वेळोवेळी होणारे छोटे-मोठे अपघात, छोट्या-मोठ्या गाड्या एकमेकांवर आदळणे या सर्व प्रकारांचा गांभीर्याने विचार करून गंगापूररोडवरील ज्योती स्टोअर्ससमोर असलेल्या व पंडित कॉलनीजवळ असलेल्या म.वि.प्र.ने उभारलेल्या मॅरेथॉन चौकात तातडीने सिग्नल अथवा स्पीड ब्रेकर बसवावा, अशी मागणी या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. सातत्याने रहदारीचा रस्ता असणारा हा रोड मृत्यूचा सापळा बनल्याची भीती व्यक्त होत आहे. गंगापूररोड सरळ जाणारा, या बाजूला अशोकस्तंभ, समोर रावसाहेब थोरात सभागृह, त्या बाजूला पंडित कॉलनी, महानगरपालिका दवाखाने, कॉलेज यामुळे सातत्याने गर्दी वाढत असून, रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना मुश्कील झाले आहे. मॅरेथॉन चौक म्हणजे शहरातील मध्यवर्ती ठिकाण. समोर ऋषिकेश हॉस्पिटल, त्याचबरोबर संध्याकाळी सर्व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे ठिकाण असल्याने या भागातील आमदार देवयानी फरांदे यांचा वॉर्ड असल्याने त्यांनीदेखील सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर बसविणे कामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परशराम राजोळे, प्राचार्य डॉ. ए. वा. ब्राह्मणकर, के. जी. हांडगे, दामू पाटील ढिकले, जी. एस. पगार, महाजन गुरुजी, पी. एस. कोंड्रा, अॅड. उदय शिंदे आदिंनी केली आहे.
मॅरेथॉन चौकात सिग्नलची मागणी
By admin | Updated: November 11, 2015 21:40 IST