सटाणा : राज्यातील सर्व बाजार समित्यांना माहिती अधिकार अधिनियम लागू नसल्याचे सांगून माहिती दडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सटाणा बाजार समितीच्या सचिवाला सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.येथील बाजार समितीच्या आवारात बाजार समिती प्रशासनाकडून मार्च २०१२ मध्ये डाळींब मार्केटसाठी गाळे बांधण्यात आले होते. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ता तुषार कारभारी खैरनार यांनी १३ एप्रिल २०१६ रोजी माहिती मागीतली होती. मात्र बाजार समितीच्या माहिती अधिकाऱ्याने बाजार समितीला माहितीचा अधिकार लागू नाही. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याचे नमूद केलेली माहिती पुरविता येत नाही. त्यामुळे दिलगीर असल्याचे खैरनार यांना लेखी स्वरूपात उत्तर दिले. खैरनार यांनी यासंदर्भात माहितीचा अधिकार अधिनियम २००५चे कलम १९ (१) नुसार बाजार समितीचे प्रथम अपिलीय अधिकारी तथा सचिव भास्कर तांबे यांच्याकडे दि. २१ जुलै २०१६ रोजी अपील केले होते. तांबे यांनीही तोच लेखी खुलासा केल्याने खैरनार यांनी सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांच्याकडे धाव घेतली. याबाबत सहायक निबंधक विघ्ने यांनी गंभीर दखल घेत दि. १० आॅगस्ट रोजी बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. कायद्याच्या तरतुदीनुसार बाजार समितीसही माहिती अधिकार अधिनियम २००५ लागू असताना खैरनार यांनी माहिती मागितली असता ती न पुरविण्याचे कारण काय? या बाबतीत स्वयंस्पष्ट खुलासा करून तत्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही नोटिसीद्वारे दिले आहेत. (वार्ताहर)
सचिवाला कारणे दाखवा नोटीस
By admin | Updated: August 14, 2016 22:46 IST