गेल्या महिनाभरापासून राज्य सरकारने संचारबंदी केली आहे, तर सोमवारी जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून कडक लॉकडाऊन घोषित केल्याने नागरिकांनी विशेषतः महिलांनी मंगळवारी (दि. ११) सकाळपासून दुकाने, पिठाची गिरणी, किराणा दुकाने, फळबाजार आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा नियम कोणीही पाळत नव्हते. दहा दिवस लॉकडाऊन घोषित केल्याने पिठाच्या गिरणीसमोर सकाळपासूनच मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. किराणा दुकानासमोर देखील हीच परिस्थिती होती. सातपूर विभागातील सातपूरगाव, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, अशोकनगर येथील भाजी मार्केट, शिवाजीनगर येथील कार्बन नाका, औद्योगिक वसाहतीतील तापरिया कंपनीसमोरील भाजीपाला मार्केट आदी ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाला.
इन्फो...
वीज पुरवठा खंडित, दळण रखडले
बुधवारपासून लॉकडाऊन घोषित केल्याने धान्य दळून घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. गिरणीसमोर मोठी रांग लागली होती. नेमकी सकाळी दहा वाजता मेंटेनन्सच्या कामासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. मेंटेनन्सचे काम दुपारनंतर करता आले असते. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने महिलांची मोठी गैरसोय झाली.