सिन्नर : शहर व तालुक्यात वीजचोरी होण्याचे प्रमाण कमी नसले तरी वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकांसह स्थानिक अधिकाऱ्यांकडून घरगुती, कृषी व वाणिज्य वापरासाठी वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, तरीही वीजचोरी थांबता थांबत नसल्याचे चित्र सर्वत्र आहे. वीज चोरांविरोधात दंडात्मक कारवाईचा शॉक दिला जात असला तरी वीजचोर निर्ढावलेलेच दिसतात.
सिन्नर तालुक्यात सुमारे २० वीज उपकेंद्र आहेत. तालुक्याचा पश्चिम पट्टा बागायतदार, तर पूर्व भाग अवर्षणग्रस्त आहे. तालुक्यात मुसळगाव आणि माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात असते. वीजपुरवठा खंडित झाल्यास औद्योगिक वसाहतीत लाखों रुपयांचे नुकसान होते. मात्र, वीजचोरांमुळे अनेकदा विजेचा तुटवडा जाणवतो. सिन्नरच्या भाग १ चे उपकार्यकारी अभियंता सचिन पवार आणि भाग २ चे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली २० उपकेंद्राचे सहायक अभियंता वीजचोरांविरोधात कारवाई करीत असतात. वीज चोरांविरोधाच्या कारवाईत विद्युत जलपंप, वायर्स, व अन्य इलेक्ट्रिक साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाते. वीजचोरी पकडल्यानंतर पंचनामा करून फोटो काढले जातात. त्यानंतर वीजचोरी करणाऱ्यास दंडात्मक बिल दिले जाते. त्यानंतरही त्याने दंडात्मक बिल न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाते.
--------------------------
सिन्नरला ३० वीजचोरांकडून १० लाखांचा दंड वसूल
सिन्नरच्या भाग -१ चे उपकार्यकारी अभियंता सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली चालू आर्थिक वर्षात २४ वीज चोरीचे गुन्हे उघड झाले. त्यांना सुमारे १० लाख रुपयांच्या दंडाचे बिल देण्यात आले होते. त्यापैकी ११ जणांकडून ७ लाख ६५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर सिन्नरच्या भाग २ चे उपकार्यकारी अभियंता ऋषीकेश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली चालू आर्थिक वर्षात ३५ वीज चोरीचे गुन्हे उघड झाले. त्यांना सुमारे ७ लाख ४० लाखांचे दंडाचे बिल देण्यात आले होते. त्यापैकी १९ जणांकडून २ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
---------------------------
‘सिन्नर तालुक्यातील वावी वीज उपकेंद्रांतर्गत वीजचोरांविरोधात कारवाई केली जाते. वीजचोरांकडून इलेक्ट्रिक साहित्य व वायर्स जप्त केल्या जातात. अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. दंड न भरल्यास वेळप्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल केले जातात.
-अजय साळवे, सहाय्यक अभियंता, वीज वितरण कंपनी, वावी
फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील वावी वीज उपकेंद्रांचे सहायक अभियंता अजय साळवे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वीजचोरांकडून जप्त केलेले साहित्य. (२४ सिन्नर विज)
240921\24nsk_25_24092021_13.jpg
२४ सिन्नर वीज