नाशिक : हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केल्याने संपूर्ण शहराचे लक्ष लागून असलेली शिवसन्मान जागर परिषद आज अक्षरश: पोलिसांच्या गराड्यात पार पडली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी घेण्यात आलेल्या या परिषदेसाठी सांगलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. राज्य सरकारने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड व अन्य पुरोगामी संघटनांच्या वतीने राज्यात ठिकठिकाणी ही परिषद घेतली जात आहे. पंधरवड्यापूर्वी सांगली येथील परिषदेत आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, तसेच त्यांच्या गाड्यांची तोडफोड झाली होती. नाशिकमध्ये ही परिषद होत असल्याचे कळताच चौदा संघटनांनी या परिषदेविरोधात जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांनाच नोटीस पाठवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी सोपवली होती. या पार्श्वभूमीवर परिषदेपूर्वीच वातावरणात तणाव निर्माण झाला होता.त्यामुळे कार्यक्रमस्थळ असलेल्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहाला सायंकाळी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. कार्यक्रमाची वेळ होईपर्यंत कोणालाही आत सोडले जात नव्हते. प्रत्येकाची तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता. आव्हाड यांच्याभोवती पोलिसांचा गराडा होता; शिवाय कार्यकर्त्यांनीही विचार मंचावर त्यांच्याभोवती पूर्णवेळ कडे केले होते. परिषदेला आमदार आव्हाड यांच्यासह ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. डॉ. प्रतिमा परदेशी, सुरेश देसले यांची प्रमुख उपस्थिती होती. आव्हाड यांनी तासाभराच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढवत पुरस्काराला विरोध केला. पुरंदरे यांनी इतिहासाचे विकृतीकरण करीत छत्रपती शिवरायच नव्हे, तर जिजामातेचीही बदनामी केली. हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक विद्वेष निर्माण केल्याच्या आरोपाखाली पुरंदरे यांना अटक करायला हवी. शिवराय हे बहुजनांचे, रयतेचे राजे होते. त्याऐवजी त्यांची हिंदुत्ववादी प्रतिमा उभी करून पुरंदरे यांनी महाराष्ट्रात खोटा इतिहास पसरवला. यापूर्वी त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकाकडे कादंबरी म्हणून पाहत होतो; मात्र सरकारने त्यांच्या लिखाणाला अधिकृत इतिहास म्हणून दर्जा दिल्याचे व पुरंदरेंना पुरस्कार जाहीर केल्याचे पाहिल्यावर विरोध तीव्र केल्याचे ते म्हणाले. समाजावर पकड निर्माण करण्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा हा कट असून, त्याला पाठिंबा देत फडणवीस सरकार हुकूमशाहीकडे जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीमंत कोकाटे म्हणाले, देशात सत्तांतरानंतर इतिहासाचा प्रवाह उलटा वाहू लागला असून, जातिव्यवस्थेला खतपाणी घातले जात आहे. चुकीच्या इतिहासाद्वारे शिवरायांना बहुजनांपासून तोडण्याचा डाव आहे. अफझल खान क्रूर असल्याने त्याला शिवरायांनी मारले. त्यांचा लढा अन्यायाविरुद्ध होता, ते धर्मयुद्ध नव्हते; मात्र त्यांची प्रतिमा मुस्लीमविरोधी तयार करण्यात आली. प्रा. डॉ. प्रतिमा परदेशी यांनीही शिवरायांना प्रथम अण्णा भाऊ साठेंनी घरोघर पोहोचवल्याचे सांगत पुरंदरेंना चाड असेल तर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारू नये, असे आवाहन केले. नागरिकांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निषेधाची पोस्टकार्डे पाठवावीत, असेही त्या म्हणाल्या. ज्ञानेश महाराव यांनी प्रथा-परंपरांवर कठोर हल्ला चढवत, खोट्या इतिहासाविरोधात आता नागरिकांनीच उभे राहावे व एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अजीज पठाण, जगदीश जाधव, राजू देसले यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या गराड्यात ‘शिवसन्मान जागर
By admin | Updated: August 3, 2015 00:32 IST