नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने नाशिक शहरात चारही जागांवर दावा सांगितला असला, तरी शिवसेनेनेच त्यापुढे इच्छुकांची चाचपणी केली आहे. जिल्ह्यातील जागांपेक्षा नाशिक शहरातील पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघांवर प्रबळ दावेदारी सांगितली आहे. दरम्यान, आमदारकी गेलेले बबनराव घोलप पुन्हा एकदा घोड्यावर बसण्याच्या तयारीत आहेत.शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिक विभागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, तसेच स्थानिक जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीत शहरातील चारही विधानसभा जागांचा आढावा घेण्यात आला. नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपाला देण्यात आला होता. परंतु या मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला. या मतदारसंघात नगरसेवक विलास शिंदे, सुधाकर बडगुजर आणि डी. जी. सूर्यवंशी इच्छुक आहेत. नाशिक पूर्वमधून इच्छुक म्हणून निवृत्ती मते, शिवाजी निमसे यांनी दावेदारी सांगितली. तथापि, इच्छुकांनी एकमत करून उमेदवार निश्चित करावा, अन्यथा एकाला उमेदवारी देण्यासाठी पक्षातील लोकही नाराज व्हायला नको, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. देवळाली विधासभा मतदारसंघातून बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दोषी ठरलेले बबनराव घोलप पुन्हा एकदा उमेदवारीसाठी तयार झाले आहेत. तांत्रिक अडचणी न आल्यास आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. अन्यथा योगेश घोलप यांचे नाव त्यांनी पुढे केले. याचवेळी माजी नगरसेवक प्रताप मेहेरोलिया यांनीदेखील इच्छुक असल्याचे सांगितले. नाशिक मध्य मतदारसंघातून माजी महापौर विनायक पांडे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि नगरसेवक सचिन मराठे यांनी दावेदारी केली असून, त्यावर ठाकरे यांनी कटूता टाळण्यासाठी सर्व इच्छुकांनी एकत्रित उमेदवारीचा निर्णय द्या, अन्यथा मी ठरवेल त्या उमेदवाराला निवडून द्यावे लागेल, असे सांगितल्याचे वृत्त आहे. बैठकीला शिवसेनेचे नाशिक विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाजपाच्या जागांवर शिवसेनेचा दावा
By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST