नाशिक : जिल्हा परिषदेत सर्वाधिक २५ सदस्य निवडून आलेल्या शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी २१ मार्च रोजी भगवा फडकविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, येत्या सोमवारी (दि.२७) नाशिकमध्ये शिवसेनेकडून निवडून आलेल्या सर्व २५ जिल्हा परिषद सदस्यांचा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते, तसेच जिल्हाप्रमुख सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत पेठ तालुक्यातून तालुकाप्रमुख भास्कर गावित व त्यांच्या स्नुषा हेमलता गावित सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. तसेच शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे दिंडोरी तालुक्यातील खेड गटातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांना पराभूत करून विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य सिन्नर तालुक्यातून पाच तर त्या खालोखाल दिंडोरीतून चार आणि इगतपुरी व येवल्यातून प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत. त्या खालोखाल नांदगाव व मालेगावमधून प्रत्येकी दोन तर चांदवडमधून एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आहेत. निवडून आलेल्या या सर्व २५ सदस्यांचा सत्कार करून पुढील नियोजनासाठी सोमवारी सेना नेत्यांंनी बैठकीचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)
शिवसेना करणार २५ सदस्यांचा सत्कार
By admin | Updated: February 26, 2017 00:36 IST