नाशिकरोड : शिखरेवाडी मैदानाकडे मनपा प्रशासन व नगरसेवकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने मैदानातील विविध सोयी-सुविधांची वाताहत होऊ लागली आहे. मैदानावरील मद्यपी, प्रेमीयुगुल व रायडर्सना रोखण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांना ‘खाकी’चा हिसका दाखवावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे. शिखरेवाडी येथील मनपाच्या मैदानावर लाखो रुपये खर्च करून जॉगिंग ट्रॅक, वृक्षारोपण, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, व्यायामाचे साहित्य, ग्रीन जिम, बसण्यासाठी बाकडे आदि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून दररोज शेकडो नागरिक, महिला फिरण्यासाठी, व्यायामासाठी येतात. तर युवक, मुले खेळण्यासाठी येतात.मनपाचे दुर्लक्षमात्र गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासन व नगरसेवकांनी मैदानाकडे दुर्लक्ष केल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. गंधर्वनगरी व शिखरेवाडी येथील मैदानाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप मद्यपी व दुचाकी रायडर्सनी तोडून टाकल्याने प्रवेशद्वार ‘सताड’ उघडे आहे. यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा,’ अशी परिस्थिती झाली आहे. दिवसभर मैदानावरील झाडाझुडपांत व भिंतीच्या कोनाड्यात प्रेमीयुगुल अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे मैदानावर फिरायला, खेळायला येणाऱ्यांना लाज वाटते, मात्र त्या प्रेमीयुगुलांना त्याच्याशी काही देणेघेणे नाही. सायंकाळनंतर मैदान हे मद्यपींसाठी सध्या मेजवानी ठरले आहे. ठिकठिकाणी युवकांचे टोळके दारू पिण्यास बसलेले असतात. दारू पिऊन झाली की, त्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे मैदानावर फिरायला व खेळायला येणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मद्यपी, प्रेमीयुगुलांना आवर घालण्याची गरज आहे. तसेच मैदानावर दुचाकीचे स्टंट करणाऱ्या रायडर्सनादेखील झटका देण्याची गरज आहे. मैदानावर वाहने शिकण्यास येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. (प्रतिनिधी)४मैदानावर मद्यपींमध्ये होणारे वादविवाद, शिवीगाळ, मारामाऱ्या यामुळे सर्वचजण त्रस्त झाले आहेत. धूमस्टाईल दुचाकी रायडर्सची स्टंटबाजी, प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, भुरटे चोर यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, अशा टवाळखोरांना ‘खाकी’चा हिसका दाखविण्याची गरज निर्माण झाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे. त्याचबरोबर पोलिसांची दिवस-रात्रीची गस्तही वाढवावी. पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. ४मैदानावरील व्यायामाचे व खेळण्याचे लोखंडी साहित्य भुरट्या चोरट्यांनी चोरून नेले आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंतीची जाळी व लोखंड चोरून नेले आहे. मैदान व त्यावरील विविध सोयी-सुविधांची दररोज होणारी वाताहत पाहून परिसरातील रहिवाशांमध्ये हळहळ व संताप व्यक्त केला जात आहे. मनपाने त्वरित मैदानाचे प्रवेशद्वार बंद करून खेळणी व व्यायामाचे साहित्य दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी खेळाडू व फिरायला, व्यायामास येणाऱ्या नागरिक, महिलांनी केली आहे.