नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षबांधणीसाठी थेट शरद पवार यांनीच पुढाकार घेतला असून, नाशिक दौऱ्यात त्यांनी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची भेट घेतली आणि संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला. पक्षवाढीसाठी जिल्हा पातळीवर आलो असलो तरी, आता तालुका पातळीपर्यंत पोहोचणार असल्याचे पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.दोन दिवस नाशिक मुक्कामी असलेल्या शरद पवार यांनी शनिवारी सकाळी मुंबई नाक्यावरील पक्षाच्या कार्यालयात हजेरी लावली. महात्मा फुले जयंतीनिमित्त पक्ष कार्यालयातील महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याला त्यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. त्यानंतर शहर व जिल्ह्यातील पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत स्वीकारताना प्रत्येकाशी डाळिंबाचे काय झाले, शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत, विजेची काय परिस्थिती आहे, द्राक्षांना आता गारपिटीनंतर काय भाव मिळेल यांसह अनेक बाबींची त्यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पक्षवाढीसाठी आता मी जिल्हापातळीपर्यंत आलो आहे. यापुढे मी तालुका-तालुक्यात फिरणार आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, आमदार दीपिका चव्हाण, विनायकदादा पाटील, माजी खासदार देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, जि.प. अध्यक्ष विजयश्री चुंबळे, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, युवक अध्यक्ष सचिन पिंगळे, छबू नागरे, राजेंद्र भोसले, उदय जाधव, विष्णुपंत म्हैसधुणे, राजेंद्र सोनवणे, देवांग जानी, दीपक वाघ, प्रेरणा बलकवडे, शोभा मगर आदि उपस्थित होते. पक्ष पदाधिकारीच नव्हे, तर लहानातील लहान कार्यकर्त्यांसोबत मनमोकळी चर्चा करताना त्यांनी कार्यकर्त्यांना फोटो काढण्याची संधीदेखील दिली. (प्रतिनिधी)
शरद पवार आता तालुका-तालुक्यात फिरणार
By admin | Updated: April 12, 2015 00:34 IST