गणेश धुरी, त्र्यंबकेश्वरपोलिसांनी साधू-महंतांच्या सूचनेनुसार हटविलेले बॅरिकेडिंगचे अडथळे आणि अमावास्येला आलेल्या दुसऱ्या शाही पर्वणीचा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने रविवारी (दि.१३) त्र्यंबकेश्वरला साधू-महंतांनी आपल्या इष्टदेवतांच्या पूजनाने ‘हर हर महादेव’च्या गजरात दुसरे शाहीस्नान निर्धारित वेळेत आटोपले.पोलीस व प्रशासनाने दिलेल्या वेळेनुसार पहिल्या शाहीस्नानाचा मान दुसऱ्या पर्वणीस श्री तपोनिधी पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत बरोबर ४ वाजून १५ मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पहिला आखाडा नियोजित वेळेपेक्षा पाऊण तास आधीच कुशावर्तावर स्नानासाठी पोहोचला. या आखाड्याचे महंत अशिषगिरीजी महाराज यांच्यासह आचार्य महामंडलेश्वर व महंत तसेच साधू व भक्तगणांनी ३ वाजून ३१ मिनिटांनी कुशावर्तात इष्टदेवतेच्या पूजनासह शाहीस्नान केले. त्यानंतर दुसऱ्या आखाड्याची वेळही कुशावर्तावर सव्वाचार वाजेची असताना प्रत्यक्षात श्री तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याच्या महंतांनी ३ वाजून ५४ मिनिटांनी कुशावर्तावर शाहीस्नान केले. तिसऱ्या शाहीस्नानाचा मान श्री शंभू पंच दशनाम आखाड्याची शाहीस्नानाची वेळ नियोजित वेळेनुसार ४ वाजून ५५ मिनिटांची असताना श्रीशंभू पंचनाम जुना आखाड्याच्या महंतांनी भक्तासह कुशावर्तावर ५ वाजून २२ मिनिटांनी हजेरी लावली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने व ठरवून दिलेल्या क्रमवारीनुसार श्री पंच अग्नी आखाडा, श्री पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री पंचायती अटल आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, पंचायती नवा उदासीन आखाडा या क्रमानुसार आखाड्यांच्या महंतांसह साधूगणांनी पर्वणी साधली. शेवटी सव्वादहा वाजता अखेरच्या शाहीस्नानासाठी श्री पंचायती निर्मल आखाड्याच्या साधू-महंतांचे कुशावर्तावर आगमन झाले. त्यानंतर साडेदहा ते पावणे अकरा वाजेच्या सुमारास श्री पंचायती निर्मल आखाड्याच्या महंतांनी कुशावर्त सोडले. दुपारनंतर भाविकांसाठी कुशावर्त स्नानासाठी खुले करण्यात आले.
‘हर हर महादेव’च्या जय घोषात शाहीस्नान
By admin | Updated: September 13, 2015 22:16 IST