सरदवाडी : नातेवाईक असल्याचे सांगून घरात आलेल्या अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सरदवाडी येथील मध्यवस्तीत भरदिवसा घडली.गावाच्या ऐन मध्यवस्तीत माजी उपसरपंच योगेश रेवगडे यांची दुमजली इमारत आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे रेवगडे कुटुंबीय शेतात गेले होते. घरात रेवगडे यांचे आजोबा सुकदेव (८३), मुलगा सिध्दार्थ (१०) व आणखी एक लहान मुलगी होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास पंचविशीतील एक तरुण रेवगडे यांच्या घरात आला. त्याचा एक साथीदार बाहेर उभा होता. घरात बसलेल्या सुकदेव रेवगडे यांना त्याने मी सिद्धार्थचा चुलत मामा असल्याचे सांगितले. योगेशने शेतजमिनीची कागदपत्रे घेण्यासाठी पाठवले असून, कागदपत्रे कोठे असल्याचे विचारले. सिद्धार्थ याने कपाटाजवळील सुटकेसमध्ये शेतजमिनीची कागदपत्रे असल्याचे सांगितल्यावर त्या चोरट्याने सिद्धार्थला किचनमध्ये जाण्यास सांगितले. याचवेळी त्या भामट्याने लाथा मारून कपाटाचा दरवाजा तोडला. लक्ष्मीपूजनानिमित्ताने बाहेर काढलेले लॉकरमधील दागिने आयतेच हाती आल्यानंतर दोघेही चोरटे पसार झाले. काहीवेळाने लहान मुलीला सायकलवर घेऊन सिद्धार्थ शेतात गेला. त्याने घडल्याप्रकाराबद्दल रेवगडे कुटुंबीयांना माहिती देताच योगेश रेवगडे यांनी घराकडे धाव घेतली असता सदर धाडसी चोरीचा प्रकार उघडकीस आला. रेवगडे यांनी तातडीने सिन्नर पोलीस ठाण्यात सुमारे वीस तोळे सोने व रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)
मध्यवस्तीतील धाडसी चोरीच्या घटनेने खळबळ
By admin | Updated: November 14, 2016 00:37 IST