नाशिक : कामगार उपआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला सुरक्षारक्षक मंडळाचा कारभार अतिशय सैरभैर पद्धतीने सुरू असून, पैसे द्या तेव्हाच ड्यूटी मिळेल, असे आडमुठे धोरण राबविले जात असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांनी केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात काही सुरक्षारक्षक ड्यूटीसाठी गंजमाळ येथील मंडळाच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत असताना त्यांना हे कटू अनुभव आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सुरक्षारक्षक मंडळाकडे नोंदणीकृत असलेले बरेचसे सुरक्षारक्षक कंपनी व्यवस्थापनाने कमी केले आहेत. करार पद्धतीनेच सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याचे धोरण कंपन्यांनी अवलंबल्यामुळे दहा ते पंधरा वर्ष सुरक्षारक्षक म्हणून काम केलेले रक्षक आज बेरोजगार आहेत. बऱ्याचशा कंपन्यांकडून करार तत्त्वावर सुरक्षारक्षकांची मागणी केली जात असतानाही मंडळाकडून केवळ चिरीमिरीसाठी कामापासून वंचित ठेवले जात आहे. मंडळाच्या अधिकाऱ्याला जोपर्यंत दीड-दोन हजार रुपये दिले जात नाही, तोपर्यंत ड्यूटी दिलीच जात नसल्याचा आरोप सुरक्षारक्षकांकडून केला जात आहे. कामगार उपआयुक्तांना अंधारात ठेवून हा प्रकार केला जात असल्याने याप्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. कंपन्यांकडून करारतत्त्वांवर सुरक्षा रक्षकांची मागणी केली जात असताना, केवळ पैशांच्या हव्यासापोटी रक्षकांच्या हाताला काम दिले जात नाही. त्यामुळे मंडळाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
सुरक्षारक्षक मंडळाचा सैरभैर कारभार
By admin | Updated: October 31, 2015 22:22 IST