लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालानंतर राज्यातील काही शाळांकडून जिल्ह्यात आपल्याच शाळेतील विद्यार्थी प्रथम आल्याचा दावा केल्याने या शाळांनी मंडळाच्याच निर्णयाला छेद दिला आहे. राज्य मंडळाकडून कोणत्याही प्रकारे गुणवत्ता यादी अथवा विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली जात नसताना शाळांकडून विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्याची घाई केली जात आहे. मंगळवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर बुधवारी राज्यातील अनेक शाळांनी प्रसारमाध्यमांना जिल्ह्यात आपल्या शाळेचा विद्यार्थी अव्वल आल्याचे सांगून विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली आहेत. मंडळाकडून गुणवत्ता यादी जाहीर न करताही शाळांनी अशाप्रकारे दावे केल्याने राज्य मंडळाच्या निर्णयाला यामुळे हरताळ फासला गेला आहे. राज्य मंडळाकडून फक्त निकाल जाहीर केला जातो. जिल्हा किंवा राज्य पातळीवर कोणताही निकाल जाहीर केला जात नसतानाही शाळांनी परस्पर दावे केल्याने राज्य मंडळाकडून या घटनेची दखल घेण्यात आली आहे. अशा प्रकारच्या तक्रारी अद्याप प्राप्त झालेल्या नसल्या तरी याबाबतची माहिती घेतली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांना निकाल कळविण्यात आला आहे. त्यामुळे शाळांना त्यांचा अंतर्गत म्हणजेच शाळास्तरावर कोण विद्यार्थी शाळेत पहिला हे कळू शकते. परंतु जिल्ह्यात आमच्या शाळेचा विद्यार्थी पहिला आल्याचे जाहीर करण्याला कोणताही आधार नसून अधिकृतरीत्या असे जाहीर करणे नियमाबाह्य ठरणारे आहे. मंडळाकडून जिल्हानिहाय गुणवत्ता यादी जाहीर केली जात नसतानाही शाळांनी अशाप्रकारचे दावे करून जाहीर करण्याच्या या प्रकारामुळे चुकीची प्रथा पडण्याची शक्यता शिक्षणक्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
राज्य मंडळाच्या निर्णयाला शाळांकडून छेद
By admin | Updated: June 1, 2017 01:53 IST