भगूर : ब्रिटिशांविरुद्ध संघर्षासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांचे भगूर येथील स्मारक आता राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.भगूर ही सावरकरांची जन्मभूमी. याठिकाणी सावरकरांचे स्मारक व्हावे ही अनेक वर्षांची मागणी होती. १९९१ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भगूर येथे भेट दिली त्यावेळी राज्यात युतीचे सरकार आल्यास सावरकरांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर केले जाईल, अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यानुसार २८ मे १९९८ रोजी या घोषणेची अंमलबजावणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांच्या हस्ते या राज्यस्मारकाचे उद्घाटन झाले. सावरकरांचे स्मारक झाल्यापासून याठिकाणी आजवर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. गेल्या १७ वर्षांत ३४ लाख पर्यटकांनी स्मारकाला भेट दिली आहे. तथापि, या स्मारकाचे आता राष्ट्रीय स्मारक म्हणून रूपांतर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी या स्मारकाला भेट दिल्यानंतर पुरातत्त्व विभागाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार या स्मारकाचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला आहे. दरम्यान, हे स्मारक राष्ट्रीय होत असताना येथील अडचणींकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, तसेच अन्य कोणत्याही सुविधा नाहीत. ज्या देवीच्या आशीर्वादाने सावरकरांनी स्वातंत्र्य लढा उभारला त्या अष्टभुजा देवीची मूर्ती खंडोबा मंदिरात ठेवण्यात आली आहे. तसेच सावरकरांचे साहित्य या स्मारकात उपलब्ध नाही. पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्यानेदेखील रात्रीच्या वेळी अनेक मद्यपी स्मारकाच्या परिसरात फिरतात, तसेच स्मारकाभोवती हातगाडी आणि फेरीवाल्यांचा गराडा पडतो यामुळे स्मारकाचे पावित्र्य नष्ट होते.
सावरकरांचे जन्मस्थान लवकरच राष्ट्रीय स्मारक
By admin | Updated: February 25, 2015 23:57 IST