नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि. १३) व रविवारी (दि. १४) होणाऱ्या ५१ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मेळाव्याचे अध्यक्षस्थान मराठीतल्या आघाडीच्या लेखिका आणि अनुवादक अपर्णा वेलणकर भूषविणार आहेत. संस्थेच्या औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता ‘फेसाटी’या कादंबरीचे लेखक व युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नवनाथ गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी गोरे यांची प्रकट मुलाखत अपर्णा वेलणकर घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. १४) सकाळी १० वाजता मेळाव्याच्या अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांची प्रकट मुलाखत प्रा. वृंदा भार्गवे घेणार आहेत. त्यानंतर ‘देवबाभळी नाटकाचा प्रवास’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. दुपारी मराठी नवकथाकार स्व. अरविंद गोखले यांच्या कथेचे सादरीकरण किरण सोनार करतील. त्यानंतर डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवाद होणार असून, ‘देशीवाद - भ्रम आणि वास्तव’ हा विषय आहे. दुपारी कवी गोविंद काव्य स्पर्धा, डॉ. अ.वा. वर्टी कथा स्पर्धा, चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धा, जयश्री राम पाठक काव्य पुरस्कार आणि विविध पुरस्कार प्राप्त लेखकांचा गौरव व पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ‘अशी पाखरे येती’ हा सांगितिक कार्यक्र म होणार आहे.लोकमत वृत्तपत्र समूहात फीचर एडिटर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा वेलणकर या दीपोत्सव या लोकमत समूहाच्या दिवाळी अंकाच्या संपादक आहेत. द गॉड आॅफ स्मॉल थिंग्ज या अरु ंधती रॉय यांच्या कादंबरीच्या मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या वेलणकर यांचे अनुवाद कौशल्य त्यातील अस्सलतेमुळेच सातत्याने वाखाणले गेले आहेत.
सावाना जिल्हा साहित्यिक मेळावा घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:01 IST
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि. १३) व रविवारी (दि. १४) होणाऱ्या ५१ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मेळाव्याचे अध्यक्षस्थान मराठीतल्या आघाडीच्या लेखिका आणि अनुवादक अपर्णा वेलणकर भूषविणार आहेत.
सावाना जिल्हा साहित्यिक मेळावा घोषित
ठळक मुद्देअध्यक्षपदी ‘लोकमत’च्या अपर्णा वेलणकर, उद्घाटक नवनाथ गोरे