सातपूर : गावठाण आणि कामगार वसाहत असलेल्या सातपूर भागात जागतिक मंदीमुळे व्यवसाय, व्यापार डबघाईस आलेले असताना महानगरपालिकेने सातपूर परिसरातील मनपा गाळ्यांच्या भाड्यात तब्बल दहा टक्के वाढ करून गाळेधारकांवर अन्याय केला असून, ही दरवाढ रद्द करण्याची मागणी गाळेधारकांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.महापालिकेने सातपूर गावात श्री छत्रपती शिवाजी मंडई, खोका मार्केट, सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट येथे व्यावसायिक गाळे उभारले आहेत. दर तीन वर्षांनी १० ते २० टक्के भाडेवाढ आणि या भाडेवाढीवर ३६ टक्के विविध कर आकारले जातात. गावठाण आणि कामगार वसाहत असलेल्या या भागातील महापालिकेने उभारलेल्या मार्केटमधील व्यावसायिक जागतिक मंदीने आधीच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यात ६ ते १० पट भाडेवाढ महापालिकेने केल्याने व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.भाडेवाढ केल्याने संतप्त व्यावसायिकांनी सातपूर विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांना निवेदन दिले व राजीव गांधी भवन येथे येऊन सभागृह नेते सलीम शेख, गटनेते अनिल मटाले यांची भेट घेऊन तीव्र भावना व्यक्त केल्या. सभागृहनेते शेख व मटाले यांच्या माध्यमातून व्यावसायिकांनी अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले व दरवाढ मागे घेण्याचे निवेदन दिले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंडई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शंकर पाटील तसेच जगदीश भट्टड, राजू पंजाबी, अशोक कदम, अशोक सोनवणे, पवन जैन, समाधान चौधरी, शंकर देवघरे, पराग कुलकर्णी, नाना महाजन, मधुकर भोंडकर, जगदीश रायते, दशरथ चव्हाण, डॉ. प्रशांत घुमरे, पंढरीनाथ कुशारे, गोकुळ घुगे, रमण लोहार, संदेश दगडे, संतोष अभंग आदिंसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
सातपूरच्या गाळेधारकांची महापालिकेत धडक
By admin | Updated: October 4, 2015 22:26 IST