मालेगाव : गेल्या दीड महिन्यापासून पाठ फिरविलेल्या पावसाचे आगमन झाले असून, रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या खरीप पेरण्यांच्या कामांना वेग येणार असून, रिमझिम पावसावर पेरणी केलेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे.मालेगाव तालुक्यात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. खते, बी-बियाणे यांचा साठा करून ठेवलेले व्यावसायिक बियाणे खरेदीसाठी शेतकरी फिरकत नसल्याने चिंतित होते. तालुक्यात रिमझिम पावसावर सुमारे १५ ते २० टक्के खरिपाच्या पेरण्या झालेल्या होत्या. आता सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ५० ते ६० टक्क्यांपर्यंत पेरण्या होऊ शकतील, असे तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी सांगितले.तालुक्यातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला होता, जनावरांचेही चाऱ्याअभावी हाल होत होते. तालुक्यातील माळमाथ्यावरील सायने, रोझे, मालनगाव, सिताणे आदि गावांमध्ये पेरण्याच झालेल्या नव्हत्या. पाऊस सुरू झाल्याने तेथील पेरणी कामांना वेग येणार आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध आहेत. बाजरी, मका आणि कडधान्ये यांचे पीक चांगले येईल तर भुईमूग पिकाच्या क्षेत्रात घट होईल, असे शेवाळे यांनी सांगितले. पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले असून, नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. (प्रतिनिधी)
मालेगाव परिसरात संततधार
By admin | Updated: July 24, 2014 01:02 IST