निफाड : तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांमध्ये मागील वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पाणीटंचाईपासून वाचण्यासाठी द्राक्षबागांमध्ये चिपाडाचा उपयोग होत आहे.मागील वर्षी निफाड तालुक्यात पाऊस कमी पडला. तालुक्याच्या पूर्व व उत्तर भागात जमिनीत पुरेसा जलसाठा झालाच नाही. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्याच्या उत्तर भागातील उगाव, खेडे, वनसगाव, नांदुर्डी, खानगाव, वनसगाव, सावरगाव, रानवड, खडकमाळेगाव या व इतर गावांतील विहिरीच्या पाण्याची पातळी गेल्या दोन महिन्यांपासून खाली गेल्याने या गावांतील द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच द्राक्ष बागायतदारांच्या विहिरी वा बोअरवेल सरासरी दीड ते अडीच तास चालत आहे व हे उपलब्ध पाणी ठिंबक सिंचनाद्वारे द्राक्षबागांना सध्या दिले जात आहे. परंतु या पाणीपुरवठ्यातही ओढाताण होत असल्याने यावर मात करण्यासाठी द्राक्षांच्या झाडांच्या खोडाजवळील बऱ्हंब्यावर ओळीने उसाचे चिपाड अंथरले जाते. (वार्ताहर)
द्राक्ष बागायतदारांसाठी चिपाड ठरताहेत संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2016 22:39 IST