सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 06:44 PM2021-04-08T18:44:43+5:302021-04-08T18:45:13+5:30

कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा तयार होऊनही विक्रीसाठी बाजारात पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Sales patch before white onion growers | सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच

सफेद कांदा उत्पादकांपुढे विक्रीचा पेच

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा कहर : आठवडे बाजार बंद, शेतकरी अडचणीत

कवडदरा : दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील पिंपळगाव डुकरा, साकूर, शेणीत, भरवीर, घोटी खुर्द परिसरातील पांढरा कांदाबाजारात विक्रीसाठी दाखल होत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढू लागल्याने कांदा विक्रीसाठी उपलब्ध असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. कांदा तयार होऊनही विक्रीसाठी बाजारात पोहोचू शकत नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यात विविध पिकांबरोबरच पांढऱ्या कांद्याचेही पीक घेतले जाते. तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध पिकांची लागवड करण्यात येत असते. विविध प्रकारच्या फळभाज्यांची, त्यामध्ये पांढऱ्या कांद्याच्या पिकांचीही लागवड केली जाते. हा पांढरा कांदा आरोग्यासाठी व शरीराची दाहकता कमी करण्यासाठी गुणकारी असल्याने या कांद्याला बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे रब्बीच्या हंगामात कांद्याचे उत्पादन तयार करून अनेक शेतकरी हा कांदा बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. विशेषत: गावोगावी भरणारे आठवडी बाजार हे या कांदा विक्रीसाठीची महत्त्वाची बाजारपेठ आहे. त्या ठिकाणीच या शेतकऱ्यांच्या कांद्यांची विक्री होत असते. साधारणपणे १०० ते १५० रुपयांना एक माळ विकली जाते. यातूनच त्यांना चांगले उत्पन्न मिळते; परंतु मागील काही दिवसांपासून या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढू लागला आहे. नागरिकांची होणारी गर्दी, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भरणाऱ्या बाजारावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता हा सफेद कांदा विकायचा कसा, असा पेच या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा अशा विक्रीसाठी अडचणी निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची विक्रीसाठी धडपड
विक्रीसाठी आठवडी बाजार खुले नसल्याने कांद्याच्या तयार केलेल्या माळा विकण्यासाठी आता हे शेतकरी कांदा वाहनात भरून एखाद्या गावाच्या ठिकाणी, नातेवाईक, आदी ठिकाणी जाऊन विक्रीचा प्रयत्न करीत आहेत. त्यासोबतच काही शेतकऱ्यांकडून समाजमाध्यमांवरून कांदा उपलब्ध असल्याची जाहिरात करून विक्री केली जाऊ लागली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, परंतु केलेला खर्च निघून दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

दरवर्षी आम्ही पांढऱ्या कांद्याची लागवड करतो. तयार झालेला कांदा विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडी बाजारांत विकतो. या कांद्याला चांगली मागणी असल्याने कांदा शेवटपर्यंत मागणीतच राहतो. मात्र आता आठवडी बाजारही बंद आहेत. ज्यांना माहीत आहे, ते शेतावर येऊन घेऊन जातात. तरीही झालेले कांद्याचे उत्पादन व होणारी विक्री यांमध्ये मोठी तफावत असून कांदा वेळेवर विकला गेला नाही तर त्याची नासाडी होण्याची शक्यता आहे.
- शरद वाकचौरे, शेतकरी
फोटो- ०८ व्हाईट ओनियन

Web Title: Sales patch before white onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.