नाशिक : महापालिकेच्या मिशन विघ्नहर्ता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा फुले कलादालनात भरविण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी ३५०० मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या हेात्या. त्यातील २७०० मूर्ती विकल्या गेल्या आहेत. त्याप्रमाणे २७ नागरिकांनी ऑनलाईन मूर्ती खरेदी केल्या आहेत. महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. काेरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची स्थिती टाळण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी मिशन विघ्नहर्ता राबविले जात आहे. त्याअंतर्गत शाडू मातीच्या मूर्तींच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विनामूल्य प्रदर्शन भरविले होते. तसेच शाडू मूर्तिकारांच्या संघटनेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, दरवर्षी महापालिका अनंत चतुर्दशीच्या दिवशीच विसर्जित मूर्तींचे दान स्वीकारत असते. यंदा मात्र प्रथमच दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांच्या विसर्जनाच्या मूर्तींचे दानदेखील स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जनाच्या दिवशी ३६९ मूर्तीचे दान महापालिकेला मिळाले आहे.
महापालिकेच्या प्रदर्शनातून २७०० गणेशमूर्तींची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 01:17 IST