निफाड : निसर्ग हा सृष्टीचा दाता आहे, संस्कृतीचा नाही. संस्कृती, सभ्यतेची शिकवण संत-महंतांनी दिली. संतांचे चरित्र या कथा नसून मानवजातीला सर्वोच्च सुखशांतीची प्रेरणा देणारे माहितीचे स्रोत असल्याचे विचार शिवभक्त तथा राष्ट्रसंत व जनार्दनस्वामी आश्रमाचे विश्वस्त भाऊ पाटील यांनी व्यक्त केले.निफाड येथील राष्ट्रसंत जनार्दनस्वामी आश्रमात श्रीमद् भागवत पारायण व संतचरित्र सत्संग प्रवचन सोहळ्यात पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भारतीय समाज, संस्कृती, राज्य, राष्ट्र याचा अलौकिक आविष्कार जपण्याची जबाबदारी आपणा सर्वांवर आहे. शरीरबल, बुद्धिबल, मनोबल, आत्मबल हे वेगवेगळे आहे. शरीरबलाची गणना पशूशी केली जाते, तर बुद्धिबल व मनोबल यांचा संबंध मानवविकासाशी असतो. पवित्र अशा आचारविचाराने व संतांच्या सेवासान्निध्याने आत्मबलाचा विकास होतो. संतांचे जीवन, आचारविचार आदर्श होते. सामाजिक सुधारणा करण्याचे कार्य संतांनी केले आहे. जीवनात जेव्हा सत्याचा यथार्थ साक्षात्कार होतो तेव्हा असत्याचा आधार आपोआप विरघळून जातो, असे ते म्हणाले. गुरुवारी महिला व मुलींकडून श्री गणेश देवतेची पंचामृत पूजा, अभिषेक, १०८ दूर्वांचे अर्चन, आरती आदि धार्मिक कार्यक्रम झाले, तर शुक्रवारी महिला व मुलींकडून श्री भगवती देवीची पंचामृत पूजा, अभिषेक, कुंकुमार्चन, कुमारिकेचे पूजन करण्यात आले. दि. ८ रोजी श्रीमद् भागवत पारायणाची सांगता होईल. संजय महाराज पगार यांचे प्रवचन होईल. श्री अमृतेश्वर महादेवाची पूजा व अभिषेक, साधुसंत पूजन, संतचरित्र सत्संग प्रवचनाने सांगता होईल. याप्रसंगी भाऊ पाटील यांच्या प्रवचनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. (वार्ताहर)
संस्कृती, सभ्यतेची शिकवण संत-महंतांनी दिली
By admin | Updated: December 4, 2015 22:28 IST