त्र्यंबकेश्वर : येथून नाशिककडे जात असलेल्या साईभक्तास भरधाव वॅगनारने मागून जोरदार धडक दिल्याने साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. मयत साईभक्ताचा भाऊपप्पू सांबरे याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.खंबाळे शिवारातील के.एल.ठाकूर फार्मच्या गेटसमोरून दिलीप देवजी सांबरे हा साईभक्त नाशिककडे पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या वॅगनारने (क्र.एमएच १४ एचडी १९४७) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात तोंड व डोक्याला जबर मार लागल्याने दिलीप जागीच ठार झाले. रात्री संशयित कारचालक निरंजन विलास सातकर (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि.पुणे) हा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याला अटक करण्यात आली. सोमवारी (दि.२०) त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास जामिनावर सोडण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
कारच्या धडकेत साईभक्त ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:13 IST