लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर
लावण्यात आलेले निर्बंध शिथिल झाल्यावरच
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी
शाळांतील २५ टक्के प्रवेश दिले जाणार आहेत. परंतु शहरात वाढणारी रुग्णासंख्या लक्षात घेता हे निर्बंध कधी शिथिल होणार हे अद्याप स्पष्ट नसल्याने पालकांना आरटीई प्रवेशासाठी आणखी काहीकाळ
प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ७ एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत जाहीर केली असून, सोडतीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १५ एप्रिलपासून एसएमएस ही प्राप्त झाले आहेत.
सोडतीत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना
प्रवेशांबाबतच्या सूचना आरटीईच्या
संकेतस्थळावरही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार
प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी
पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी
करून घेणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनाच्या
प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधामुळे सध्या ही सर्व प्रवेशप्रक्रिया ठप्प झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी देशव्यापी टाळेबंदी सुरू असताना प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली नाही. टाळेबंदी शिथिल झाल्यावर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
पॉइंटर-
जिल्ह्यातील अशी स्थिती
शाळा -४५०
उपलब्ध जागा-४५४४
प्राप्त अर्ज - १३३३०
लॉटरीत निवड - ४२०८
---
राज्यात अशी स्थिती
शाळा - ९४३२
उपलब्ध जागा-९६६८४
प्राप्त अर्ज - २२२५८४
लॉटरीत निवड - ८२१२९
इन्फो -
निर्बंध शिथिल झाल्यानंतरच पडताळणी
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य
शासनाने सध्या खासगी आस्थापने बंद ठेवण्याचे
आणि शासकीय कार्यालयांत १५ टक्के उपस्थितीचे
निर्बंध आहेत. तसेच, संसर्गाची परिस्थिती पाहता
सध्या प्रवेशप्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही.
आता निर्बंध शिथिल झाल्यानंतरच कागदपत्र
पडताळणी आणि प्रवेश सुरू केले जातील, असे
प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात
आले आहे.