नाशिक : शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी वाढल्याने रिक्षातून सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करताना अनेकदा हुज्जतीचा सामना करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुजोर रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे सर्व नियम, कायदे पायदळी तुडवून शहरात वाहतूक करत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सुटे पैसे, अपुरी जागा, विलंब अशा किरकोळ कारणांवरून मुजोर रिक्षाचालक विशेष करून महिला, युवती व शाळकरी विद्यार्थ्यांसोबत वाद घालत दादागिरी करत असल्याच्या तक्रारींमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे रिक्षाचालक शहरातील रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करताना सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतानाही दिसून येत आहे. घोषित केलेल्या एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जाणे, अन्य नागरिकांसोबत वाद घालणे, सिग्नलवर बेशिस्तपणे झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन उभे करणे, सिग्नल सुटण्यापूर्वीच बळजबरीने भरधावपणे सिग्नल ओलांडत समोरच्या वाहनचालकांचा जीव धोक्यात घालणे आदि प्रकार सर्रास होत असल्याने वाहतूक नियमांचे जणू पालन करणे आमच्यावर बंधनकारकच नसल्याच्या आविर्भावात काही मुजोर रिक्षाचालक सर्रास वावरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, शहर वाहतूक शाखेने मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सिग्नलवर काही मुजोर रिक्षाचालक बेशिस्तपणे वाहन लावून तसेच साउंडसिस्टीमचा दणदणाट करत रस्त्यावर थुंकत ‘भाई’गिरी दाखविण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अशावेळी काही जागरूक नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी वाद घालताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकांच्या मुजोरीने प्रवाशांचे हाल
By admin | Updated: February 25, 2017 00:43 IST