नाशिक : राजस्थानच्या चौघा युवकांना बनावट कागदपत्रे व सही शिक्के मारून आर्टिलरी सेंटरमध्ये भरती केल्याचे दाखवत फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा प्रमुख सूत्रधार सेवानिवृत्त कर्नल सुखप्रितसिंग अर्जुनसिंग रंधवा (५९, बी-६१, सेक्टर ४०, नोएडा, उत्तर प्रदेश) यास नाशिक न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ नाशिक पोलिसांनी संशयित रंधवाला ३० आॅगस्ट रोजी दिल्लीतून ताब्यात घेतले होते़ दरम्यान, यातील दोन संशयित अद्यापही फरार आहेत़राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील बलबीर रामचंद्र गुजर, सुरेशकुमार शिवचरण महंतो, सचिनकुमार किशनसिंह, तेजपाल मोतीराम चोपडा या चौघांनी व त्यांच्या नातेवाइकांनी आर्टिलरी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी दिल्लीतील एका टोळीला पैसे दिले होते. त्यांनी दिलेल्या बनावट कागदपत्र व सही शिक्क्यांवरून हे चौघेजण नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये गेल्या जुलै महिन्यात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये संशय आल्याने अधिक माहिती घेण्यात आली. त्यामध्ये राजस्थानच्या चौघा युवकांनी लष्करात दाखल होण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बोगस सैन्यभरती प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार रंधवा व एजंट मेघवाल यांच्या पोलीस कोठडीत या फसवणुकीची संपूर्ण प्रकरणाची माहिती समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)
सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रंधवाला पोलीस कोठडी
By admin | Updated: September 2, 2016 22:49 IST