नाशिक : दसऱ्यानंतर चाहूल लागणाऱ्या दिवाळी सणाचे मुख्य आकर्षण असलेल्या फटाके उडविण्यावर यंदाही शासनाने काही निर्बंध लादले असून, मोठ्या आवाजाच्या सर्व प्रकारच्या फटाक्यांवर पूर्ण बंदी लादण्याबरोबरच फटाके विक्री करणाऱ्या दुकानांसाठीही नियमावली करण्यात आलेली आहे. त्यात प्रत्येक दुकानामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फटाक्यांची विक्री व त्याचा वापर याबाबत सर्वोच्च न्यायालय, पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये निश्चित करण्यात आलेल्या नियमांन्वये दि. १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीसाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात मोठ्या आवाजाचे फटाके उडविणे, तसेच निष्काळजीने शोभेचे दारूकाम करण्यामुळे जनतेच्या जीवित व मालमत्तेस हानी पोहोचण्याची शक्यता गृहीत धरून काही निर्बंध लादले आहेत. त्यात फटाके उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात आली असून, फटाके विक्रीच्या दुकानांना गर्दीच्या, वर्दळीच्या तसेच सार्वजनिक रस्त्यांवर अनुमती देण्यात येऊ नये, त्याचबरोबर शाळा, महाविद्यालय व धार्मिकस्थळाच्या शेजारी फटाके विक्रीची दुकाने नको, अशी अट घालण्यात आली आहे. फटाक्यांची दुकाने जमिनीलगत असावीत, तसेच प्रत्येक दुकानात फक्त ५० किलो फटाके व ४०० किलो शोभेचे फटाके असावेत, त्यापेक्षा जास्त साठा करण्यासही मज्जाव करण्यात आलेला आहे. फटाके विक्री स्टॉलचे प्रवेशद्वार समोरासमोर नको, तसेच दुकानात ग्राहकांची जास्त गर्दी होऊ देऊ नये, त्याचप्रमाणे १८ वर्षाच्या खालील मुलांना फटाके विक्री करता येणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेत फटाके उडविणाऱ्या नागरिकांवरही बंधने असून, गर्दीच्या ठिकाणी फटाके न उडविता मोकळ्या जागेतच ते उडविण्यात यावे व फटाक्यांचा आवाज कोणत्याही परिस्थितीत १२५ डेसिबलपेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीच्या फटाक्यांवर बंधने
By admin | Updated: October 23, 2015 21:40 IST