नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संस्था संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या सभासद मतदारांचे ठराव पाठविण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत ११८९ पैकी ११३० मतदार सभासदांचे ठराव जिल्हा मजूर संघाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या ठरावांची प्रारूप यादी २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.दरम्यान, प्रारूप यादी उपनिबंधक कार्यालयास सादर होताच त्यावर हरकती व सुनावणी घेण्यात येऊन लवकरच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानंतर लवकरच जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.ज्यांच्याकडे थकबाकी आहे, अशा मतदार सभासदांना मतदानाचा अधिकार नसल्याने त्यांची नावे ठरावातून पाठविण्यात येऊ नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हा मजूर संघाच्या वतीने मजूर संस्थांना देण्यात आल्या आहेत.जिल्हा मजूर सहकारी संघाचा पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्याअनुषंगाने प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले होते. शनिवारपर्यंत मजूर सहकारी संस्थांनी त्यांच्या मतदार प्रतिनिधींचा ठराव करून तशी नावे जिल्हा मजूर संघाला कळविणे आवश्यक होते. जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागताच आजी-माजी संचालकांनी त्यांच्या समर्थकांच्या नावे मतदार प्रतिनिधींचे ठराव करण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
मजूर संघासाठी ११३० उमेदवारांचे ठराव
By admin | Updated: November 25, 2015 23:11 IST