सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, अनियमित व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही केवळ संबंधित विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सिडकोतील पाणीप्रश्न विस्कळीत झाला असल्याचे बोलले जात आहे.सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पाथर्डी फाटा, वासननगर भागातही मध्यरात्री केव्हातरी पाणीपुरवठा होत असल्याचे महिलावर्गाने मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. सिडको तसेच पाथर्डी फाटा, वासननगर भागातील पाणीप्रश्न गंभीर बनलेला असतानाही याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक व महिलावर्गाकडून केला जात आहे. जुने सिडको, तुळजाभवानी चौक परिसर, उपेंद्रनगर, पाटीलनगर, खुटवडनगर यांसह परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. प्रभाग ४९ मध्ये तर गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्न अत्यंत गंभीर बनलेला असून, याबाबत नागरिकांनी प्रभागाच्या नगरसेवक सुवर्णा मटाले यांची भेट घेऊन पाणीप्रश्न सुरळीत करण्याची मागणी केली. नगरसेवक मटाले यांनीही प्रभागातील पाणीप्रश्नाबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी याबरोबरच आयुक्तांचीही भेट घेतली; परंतु यानंतरही पाणीप्रश्न अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.ऐन सणासुदीच्या दिवसांत पाणीप्रश्नाने महिलावर्ग त्रस्त झाला असून, याबाबत त्वरित सुधारणा करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
सिडकोत विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे संताप
By admin | Updated: September 29, 2014 00:21 IST