नाशिक : दोन महिन्यांपूर्वी एस.टी. बसच्या धडकेने रस्ता ओलांडताना लहानग्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागल्यानंतर निमाणी ते आडगाव दरम्यानच्या सेवाकुंज येथे पोलीस खात्याने स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविली खरी; परंतु त्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक न केल्याने ही यंत्रणा कुचकामी ठरली असून, सिग्नलचा विचार न करता भरधाव वाहने पुन्हा या मार्गावरून धावू लागल्याने दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून सेवाकुंज येथील सिग्नल असूनही नसल्यासारखाच असून, कधी कधी सिग्नल पूर्ण बंद तर ज्यावेळी तो चालू असेल तेव्हा त्याचे उल्लंघन करण्याकडेच वाहनचालकांचा कल आहे. परिणामी परिसरातील शाळा सुटल्यानंतर पुन्हा या ठिकाणी विद्यार्थ्यांची गर्दी व वाहनांची कोंडी अशी दुहेरी समस्या नेहमीच भेडसावू लागली असून, या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी सेवाकुंज चौफुलीवरच रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला धडक दिल्यानंतर तिचा नातू रोणीत चौहान हा सहावर्षीय बालक एस.टी. बसखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर संतप्त नागरिकांनी आंदोलन करून पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला होता, त्यावर जागे झालेल्या महापालिका व पोलीस विभागाने याठिकाणी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवून काही दिवस कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूकही केली; परंतु नव्याचे नऊ दिवस याप्रमाणे पोलीस पुन्हा गायब झाले, तर सिग्नलदेखील बेभरोसे असल्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी व अपघातसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
...तर सेवाकुंजसमोर दुर्घटनेची पुनरावृत्ती !
By admin | Updated: December 3, 2015 23:35 IST