नवनिर्वाचित सभापती योगेश शेवरे यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरियाच्या वाढत्या प्रादुर्भावावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना नगरसेवक सलीम शेख यांनी चर्चेत भाग घेताना, डेंग्यू, चिकुनगुन्या, मलेरियासारखी रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्य विभागाने सातपूरची अक्षरशः वाट लावली आहे. संपूर्ण यंत्रणा सपशेल कुचकामी ठरत आहे. यापुढील काळात मनपा आरोग्य विभागाची यंत्रणा कुचकामी ठरली, तर आम्ही नागरिकांना सोबत घेऊन आमची स्वतंत्र आरोग्य यंत्रणा उभी करून घरोघरी जाऊन कामे करू, असा संतप्त इशारा नगरसेवक सलीम शेख यांनी दिला. सभापती शेवरे यांनी आजारांना रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा प्रश्न करून, मलेरिया विभागातील कर्मचारी केवळ नगरसेवकांच्या घरी आरोग्य तपासणी व सूचना करण्यास जातात. सर्वसामान्य नागरिकांच्या घरी कधी पोहोचणार? विभागात केवळ दिखाव्यापुरती कामे केली जात असल्याचे सांगून शेवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शुक्रवार (दि. २३) पासून विभागात संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी सांगितले.
बैठकीत स्वच्छता व आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, मलेरिया, ड्रेनेज, भुयारी गटार आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.