नाशिक : लष्करी हद्दीभोवती संरक्षण खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नवीन बांधकामांवर निर्बंध कायम असून सदर निर्बंधातून नाशिकला वगळण्यात आल्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश अद्याप महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचा दावा नगररचना विभागाच्या सूत्रांनी केला आहे. २५ आॅक्टोबर २०१६ रोजी संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने एक पत्रक जारी केले आहे. त्यात लष्करी हद्दीपासून दहा मीटर अंतरापर्यंत बांधकाम निषिद्ध क्षेत्र असलेली १९३ ठिकाणे तर शंभर मीटरपर्यंत निर्बंध असलेल्या १४४ ठिकाणांची यादी दिलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लष्कराने बांधकामावर घातलेल्या निर्बंधावर चर्चा सुरू होऊन परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, यासंबंधी घोषित झालेल्या ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन याद्यांमध्ये नाशिकचे नावच नसल्याचे मत महापालिकेच्या निवृत्त शहर अभियंत्याने नोंदविल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु, महापालिकेच्या नगररचना विभागाशी याबाबत संपर्क साधला असता, नाशिकचे नाव वगळण्याबाबतचे कोणतेही स्पष्ट निर्देश महापालिकेला प्राप्त झाले नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये लष्कराने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यानुसार, हद्दीपासून शंभर मीटर अंतराच्या आत कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तसेच १०१ ते ५०० मीटर अंतराच्या परिघात नवे बांधकाम करताना केवळ पंधरा मीटर उंचीपर्यंतच बांधकाम करता येईल. त्यामुळे सदर मार्गदर्शक तत्त्वानुसार शासनाकडेही महापालिकेने पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविले होते. त्यानुसार, लष्करी हद्दीलगत बांधकाम करताना अगोदर लष्कराचा ना हरकत दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. सन २०१६ मध्ये संरक्षण खात्याच्या मिळकत विभागाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केवळ सुधारणा केली आहे. त्यात सुधारित तत्त्वे कोणत्या शहरांसाठी लागू होतील, त्याची यादी देण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकचे नाव नसल्याने नाशिकवरील निर्बंध कायम असल्याचा दावाही सूत्राने बोलताना केला. (प्रतिनिधी)संभ्रमावस्था ‘जैसे थे’महापालिकेच्या नगररचना विभागाने लष्करी हद्दीतील बांधकामाबाबत अद्यापही मनाई असल्याचा दावा केला आहे, तर मनपाच्याच निवृत्त अभियंत्याने सदर निर्बंधातून नाशिकला वगळल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे निर्बंधाबाबत संभ्रमावस्था जैसे थे आहे.
लष्करी निर्बंधावर महापालिका ठाम
By admin | Updated: March 30, 2017 00:13 IST