पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी गंभीरपणे दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरून सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करत संशयित मंगेश भास्कर पगारे (२६), मयुर त्र्यंबक देवकर (२५, दोघे रा. स्नेहनगर, म्हसरुळ) आणि अक्षय अविनाश जाधव (२६, रा.पेठरोड) या तिघांना बेड्या ठोकल्याचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले. याप्रकरणी महात्मानगर येथे राहणाऱ्या मिलिंद विवेक कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे. हा सगळा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वर पोपट गायकवाड हा कर्मचारी पंपावर दुचाकी वाहनांत पेट्रोल भरण्याचे काम करत होता. यावेळी काही संशयित त्याठिकाणी दुचाकी घेऊन आले. त्यांनी दुचाकीत पेट्रोल भरण्यास सांगितले. मात्र, पंपावर काम करणाऱ्या गायकवाड याने ‘हेल्मेट नसल्याने पेट्रोल देता येणार नाही’ असे सांगितले. त्यामुळे चौघांनी कुरापत काढून गायकवाड याला बाजूला ओढून नेत शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यावेळी एकाने तर मोठा दगड उचलून गायकवाडच्या दिशेने फेकल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.
---इन्फो--
बंदोबस्तावरील पोलीस गायब
‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ या उपक्रमांतर्गत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांना हेल्मेट अनिवार्य केले आहे. विना हेल्मेट पेट्रोल दिले जाते की नाही, याबाबत कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची पंपांवर बंदोबस्तासाठी नियुक्ती करावी, असे आदेश दिले आहेत. म्हसरूळ शिवारातील ज्या पेट्रोल पंपावर मारहाणीची घटना घडली त्याठिकाणी पोलीस कर्मचारी त्यावेळी बंदोबस्तावर हजर नव्हते. पोलीस असते तर संशयितांनी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचे धाडस दाखविले नसते, अशी चर्चा सुरू आहे.
--इन्फो--
पाण्डेय तत्काळ पंपावर हजर
पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या घटनेनंतर स्वत: जाऊन पेट्रोलपंपाला भेट दिली. पंपचालकासह ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली, त्याच्याशी संवाद साधला. यावेळी संशयितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच गुन्हे शोधपथकाला तत्काळ आदेशित करत मारहाण करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यास पाण्डेय यांनी सांगितले. पंपावर अधिक पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला केल्या आहेत.
190821\19nsk_10_19082021_13.jpg
राडा पेट्रोल पंपावर